अमेरिकेत एका चिनी संसोधकाला व्यापाराशी निगडित काही विशेष माहिती चोरल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. व्हर्जिनिया विद्यापीठात सदर व्यक्ती संशोधक म्हणून काम करते. तो चीनला जाणाऱ्या विमानात बसण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याला अटक करण्यात आली. या ३४ वर्षीय आरोपीचं नाव हायजो हू असं आहे.

हायजो हू या चिनी नागरिकावर प्रशासनाच्या परवानगीशिवाय कंप्म्युटरपर्यंत पोहोचणे आणि त्यातून व्यापारासंबंधी गुप्त माहिती मिळवणं, असे आरोप ठेवण्यात आल्याचं न्याय विभागाकडून सांगण्यात आलं. “अमेरिकेतील व्हर्जिनिया विद्यापीठात संशोधत म्हणून कार्यरत असलेल्या चिनी नागरिक हायजो हू याला अटक करण्यात आली आहे. चीनला जाणाऱ्या विमानात बसण्य़ाच्या प्रयत्ननात असतानाच त्याला अटक करण्यात आली. अमेरिकेचे अॅटर्नी थॉमस टी. कुले आणि डेव्हिड डब्ल्यूएसटी. एफबीआयच्या रिचमंड विभागानं त्याच्या अटकेची माहिती दिली,” असं एका पत्रकाद्वारे सांगण्यात आलं आहे.

आणखी वाचा- चीनची अमेरिकेला धमकी; वी-चॅटवर बंदी घातली तर Apple…

“कागदपत्रांनुसार, तपासकर्त्यांना सर्वप्रथम २५ ऑगस्ट २०२० रोजी हू बाबत माहिती मिळीली होती. तो बायो मिमिक अँड फ्लूड डायनॅमिक्सवर संशोधन करत होता. त्यानं शिकागोतील विमानतळावरून चीनला जाणाऱ्या विमानात बसण्याचा प्रयत्न केला होता. तसंच त्यावेळी अधिकाऱ्यांद्वारे केलेल्या तपासणीत त्याच्याकडे सॉफ्टवेअर कोड असल्याचं आढळून आलं,” असंही न्याय विभागाच्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि चीन या दोन देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेनं ह्युस्टनमधील चीनचे दुतावास बंद करण्याचे आदेश दिले होते. याद्वारे गेल्या अनेक वर्षांपासून हेरगिरी केली जात असल्याचा आरोपही अमेरिकेकडून करण्यात आला होता.