चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी शुक्रवारी गलावानच्या खोऱ्यामध्ये भारत आणि चिनी सैन्यादरम्यान झालेल्या हिंसक झटापटीचा व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओत नदी पात्रामध्येच भारतीय सैनिक आणि चिनी सैनिक आमनेसामने आल्याचे दृष्य दिसत आहे. या व्हिडीओमध्ये गुडघाभर पाण्यामध्ये नदीपात्रात दोन्ही बाजूकडील सैन्य एकमेकांशी हुज्जत घालताना, एकमेकांना धक्काबुक्की करताना दिसत आहे. चीनने गुरुवारी पहिल्यांदाच गलवानमधील हिंसेमध्ये चार चिनी सैनिकांचा मृत्यू झाल्याचे मान्य केल्यानंतर आज हा व्हिडीओ समोर आला आहे.

चीनने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला वेगवान प्रवाह असणाऱ्या नदीपात्रामध्ये चीन सैनिक आणि भारतीय सैनिकांमध्ये झटापटी होताना दिसते. त्यानंतर या व्हिडीओमध्ये दोन्हीकडील सैनिक एकमेकांना धक्काबुक्की करताना दिसत आहे. काही चिनी अधिकारी हल्ल्यासंदर्भातील नियोजन आणि आरडाओरड करतानाही या व्हिडीओत दिसत आहे. अनेक ठिकाणचे व्हिडीओ कट एकत्र करुन हा व्हिडीओ तयार करण्यात आल्याचं दिसून येत आहे. काही दृष्यांमध्ये दोन्हीकडील सैनिक मानवी साखळी तयार करुन एकमेकांना थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतायत. त्याचप्रमाणे डोंगराळभागांमधून रात्रीच्या वेळी गाड्यांमधून केलेल्या प्रवासाची काही दृष्य आणि रात्रीच्या अंधारामध्ये लाईट्सचे फ्लॅश पाडून मोठा आरडाओरड होतानाची दृष्येही या व्हिडीओमध्ये आहेत.

करोनाच्या संकटानं मगरमिठी मारलेली असतानाच पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीत भारत व चिनी सैन्यामध्ये रक्तरंजित संघर्ष उफाळून आला होता. १५ जून २०२० रोजी मध्यरात्री हा लष्करी संघर्ष झाला होता. या घटनेत भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशातील संबंध कमालीचे ताणले गेले होते. त्याचबरोबर गलवान व्हॅलीतील संघर्षानं भारत-चीन सीमेवर युद्धसदृश्य स्थितीही निर्माण झाली होती. या घटनेत भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्याचबरोबर चिनी लष्कराचेही सैनिक मारल्या गेल्याचं वृत्त होतं, मात्र चीनने आपले सैनिक मारल्या गेल्याची वाच्यता केली नव्हती. त्यावरील पडदा अखेर दूर झाल आहे. ‘पीपल्स डेली’नं दिलेल्या माहितीनुसार चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगाने काराकोरम पर्वतावर कर्तव्यावर असलेल्या आणि जूनमध्ये शहीद झालेल्या चार सैनिकांचा गौरव केला आहे. या चार सैनिकांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

‘ग्लोबल टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार गलवान व्हॅलीत पाच सैनिकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. कमांडर क्यूई फबाओ, चेन होंगुन, जियानगॉन्ग, जिओ सियुआन आणि वाँग जुओरन अशी या जवानांची नावं आहे. यातील चौघांचा मृत्यू गलवान व्हॅलीतील संघर्षात झाला होता. तर एकाचा मृत्यू मदत मोहिमेदरम्यान नदीत वाहून गेल्यानं झाला होता.