पूर्व लडाख व सिक्कीममधील सीमेवर निर्माण झालेल्या वादमुळे भारत आणि चीन सैन्यात तणाव सुरु असून चर्चेच्या माध्यमातून शांततेच्या मार्गाने मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. यादरम्यान पूर्व लडाख येथील तीन ठिकाणांवरुन चीनने आपलं सैन्य मागे घेतलं असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या आठवड्यात भारत आणि चीनमध्ये होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लडाखमधील गालवान येथून चीनचे सैनिक अडीच किमी मागे हटले आहेत. भारतीय लष्करानेही आपलं सैन्य मागे घेतलं आहे. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

सीमा वादावरुन भारत आणि चीनमध्ये अद्याप काही मुद्द्यांवर चर्चा होणं बाकी आहे. भारत आणि चीनच्या अधिकाऱ्यांमध्ये लवकरच चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. ब्रिगेडिअर आणि मेजर स्तरावर ही चर्चा होणार आहे. पेट्रोलिंग पॉइंट १४, १५ आणि हॉट स्प्रिंग्स या तीन ठिकाणी ही बैठक होणार असल्याची माहिती एएनआयाने सरकारी सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

६ जून रोजी झालेली चर्चा आणि पुढील काही दिवसांत होणारी चर्चा लक्षात घेत चीनने गालवान व्हॅली, पीपी-१५ आणि हॉट स्प्रिंग्स येथून आपलं सैन्य दोन ते अडीच किमी मागे घेतलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

चीनने सैन्य मागे घेतलं असल्याने भारतानेही आपलं काही सैन्य आणि वाहने या परिसरांमधून मागे हटवली आहेत. सध्या बटालियन कमांडर स्तरावर चर्चा सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दली आहे. चीनने पूर्व लडाखमधून याच ठिकाणी आपल्या हालचालींना सुरुवात केली होती असं सांगण्यात येत आहे.

दरम्यान भारतीय लष्कराची टीम आधीच चुशूल येथे उपस्थित असून चीनच्या सैन्यांसोबत चर्चा करत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. भारत व चीन यांच्यातील सीमा ३४८८ कि.मी लांबीची असून अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनने केला आहे, जो भारताने फेटाळला आहे.

दोन्ही देशांमध्ये गेल्या महिन्यात पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. ५ आणि ६ मे रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापटीची घटना घडली होती. तर ९ मे रोजी उत्तर सिक्कीम भागातही अशी घटना घडली होती. चीनच्या लष्करानं लडाखमध्येही अनेक ठिकाणी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर भारतानं चीनच्या लष्कराला उत्तर देत अधिक जवान तैनात केले होतं. तसंच सॅटलाईटवरून मिळालेल्या चित्रांनंतर चीननं एलएसीवरही मोठ्या प्रमाणात लष्करासाठी पायाभूत सुविधांची उभारणी केल्याचं दिसून आलं होतं.