आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथील चॉकलेट विक्रेत्याच्या बँक खात्यात तब्बल १८ कोटी जमा झाले आहेत. आयकर विभागानेही या व्यवहाराची दखल घेत चॉकलेट विक्रेत्याला नोटीस पाठवली आहे. या व्यवहारांशी माझा काहीच संबंध नाही असे त्या चॉकलेट विक्रेत्याचे म्हणणे आहे.

विजयवाडा येथे राहणारे सी किशोरलाल (वय ३० वर्ष) हे चॉकलेट विकण्याचे काम करतात. घरोघरी जाऊन चॉकलेट विकण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. अहमदाबादमधील श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी या बँकेची एक शाखा नुकतीच विजयवाडा येथे सुरु झाली. या शाखेत किशोरलाल यांनीदेखील खाते उघडले होते. किशोरलाल यांच्या खात्यात तब्बल१८ कोटी रुपये जमा झाल्याने किशोरलाल सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आयकर विभागाने किशोरलाल यांना नोटीस बजावली असून हे पैसे कुठून आले याचे स्पष्टीकरण द्यावे असे नोटीशीत म्हटले आहे.

[jwplayer w7upVxQD]

आयकर विभागाच्या नोटीशीने किशोरलाल यांना धक्का बसला आहे. मी घरोघरी जाऊन चॉकलेट विकतो, माझ्या स्वतःच्या घरी चॉकलेट ठेवायला पुरेशी जागा नाही. मग माझ्याकडे १८ कोटी रुपये कुठून येणार असा सवाल किशोरलाल यांनी उपस्थित केला आहे. श्री रेणुकामाता बँकेत माझ्यासारख्या असंख्य विक्रेत्यांनी खाते उघडले होते असे किशोरलाल यांचे म्हणणे आहे.

किशोरलाल यांनी व्यवहाराविषयी माहित नसल्याचे म्हटले असतानाच या खात्यात गेल्या काही दिवसांत मुंबईतून संशयास्पद व्यवहार झाल्याचे आयकर विभागाच्या चौकशीतून समोर आले आहे. आयकर विभागाने आता बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला असून १० दिवसांत फुटेज देण्याचे निर्देशही विभागाने दिले आहेत. या संशयास्पद व्यवहारांमध्ये अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा प्राथमिक अंदाज आयकर विभागाने व्यक्त केला आहे.

[jwplayer eIhxFJsv-1o30kmL6]