नवी दिल्ली : ऑगस्टावेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणाशी संबंधित काळ्या पैशाच्या व्यवहारात माफीचे साक्षीदार असलेल्या राजीव सक्सेना  यांना उपचारासाठी परदेशात जाण्याकरिता परवानगी देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निकालास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने १० जून रोजी दिलेल्या निकालावर सक्तवसुली संचालनालयाने दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर न्या. संजीव खन्ना आणि न्या. बी.आर गवई यांनी सक्सेना यांना नोटीस जारी केली आहे. उच्च न्यायालयाने सक्सेना यांना उपचारासाठी २५ जून ते २४ जुलै दरम्यान ब्रिटन व युरोप, अमेरिका या देशांना भेट देण्यासाठी परवानगी दिली होती. सक्सेना यांना रक्ताचा कर्करोग व इतर आजार आहेत. सक्सेना हे दुबई येथील यूएचवाय सक्सेना व मॅट्रिक्स होल्डिंग्ज कंपनीचे संचालक आहेत. ते ३६०० कोटींच्या ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यात आरोपी असून त्यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने आरोपपत्र दाखल केले होते.

उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने तीन आठवडय़ांसाठी स्थगिती दिली आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्राच्या (एम्स) डॉक्टरांकडून सक्सेना यांची मानसिक व शारीरिक तपासणी करून तीन आठवडय़ात अहवाल सादर करावा असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.