महिलेवर बलात्कार करून जाळल्याचे प्रकरण

हैदराबादमध्ये एका महिला पशु चिकित्सकावर बलात्कार करून तिला जिवंत जाळल्याच्या प्रकरणी राजकीय नेत्यांना रविवारी जनक्षोभाचा सामना करावा लागला. ही महिला जेथे राहत होती तेथे भेट देण्यासाठी गेलेल्या नेत्यांना माघारी पिटाळण्यात आले.

तेथील रहिवाशांनी शमशाबाद येथील वसाहतीची दारे बंद करून घेतली होती. तेथे त्यांनी ‘नो मीडिया, नो पोलीस, नो आउटसाइडर्स, नो सिम्पथी, ओन्ली अ‍ॅक्शन, जस्टीस’असे लिहिलेले फलक  हातात  धरले होते.

या घटनेचा निषेध करताना एका महिलेने असा प्रश्न केला की, मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी या प्रकरणावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही, ही घटना गुरुवारी घडलेली असूनही त्यांनी काहीत वक्तव्य केले नाही. पोलिसांनी चार आरोपींना पकडले असून त्यांनी गुन्ह्य़ाची कबुली दिली आहे. पण मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी न्याय मिळवून देण्याबाबत एक शब्दही उच्चारलेला नाही. आरोपींनी  पीडित महिलेला जी वागणूक दिली तीच आरोपींना का देऊ नये अशी विचारणाही तिने केली.

पंतप्रधान मोदी यांनी या घटनेवर अजून ट्विट करण्याची तसदी का घेतली नाही अशी विचारणा आणखी एका महिलेने केली.

माकपचे माजी आमदार जे. रंगा रेड्डी व त्यांच्या कार्यकर्त्यांना तेथील रहिवाशांनी माघारी पिटाळले.

रेड्डी यांनी सांगितले की, आम्ही पीडित महिला जेथे राहत होती त्या वसाहतीच्या प्रवेशद्वाराशी बसून त्या कुटुंबाला पाठिंबा व्यक्त केला आहे. यात मुख्यमंत्र्यांनी उपाययोजना करण्याची गरज आहे. काही राजकीय नेते व चित्रपट अभिनेते यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन चर्चा केली.

ही महिला सरकारी रुग्णालयात पश चिकित्सक म्हणून काम करीत होती. २८ नोव्हेंबरच्या सकाळी शाडनगर येथे तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. त्याआधीच्या रात्री ती बेपत्ता झाली होती. तिच्यावर एका ट्रकमधील चार जणांनी बलात्कार करून तिला ठार मारले व नंतर मृतदेह पेटवून दिला होता.

आरोपींचे वकीलपत्र न घेण्याचा वकील संघटनेचा निर्णय

येथे एका पशुवैद्यक महिलेवर बलात्कार करून नंतर तिला जाळून टाकल्याच्या प्रकरणी जिल्हा बार असोसिएशनने चार आरोपींचे वकील पत्र कुणीही वकिलाने न घेण्याचा निर्णय रविवारी जाहीर केला आहे. रंगारेड्डी  बार असोसिएशनचे अध्यक्ष मट्टापल्ली श्रीनिवास यांनी सांगितले की, नैतिक, सदर महिलेवर बलात्कार करून खून केल्याच्या प्रकरणी  सामाजिक जबाबदारी म्हणून आरोपींचे  वकीलपत्र कुणीही घेऊ नये असे ठरवण्यात आले. त्यांना कोणतीही कायदेशीर मदत दिली जाणार नाही. या परिस्थितीत न्यायालय त्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून वकील मिळवून देऊ शकते. त्यामुळे तेव्हा न्यायालयाने आदेश दिला तर त्याचे पालन मात्र करावेच लागेल.या चार आरोपींवर ज्या कलमाखाली गुन्हे दाखल आहेत त्यातील काही कलमांच्या गुन्ह्य़ास फाशीची शिक्षा आहे. या प्रकरणात जलदगती न्यायालय स्थापन  करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे.

डबे, बाटलीतून पेट्रोल-डिझेल विक्रीचा मुद्दा ऐरणीवर

बलात्कारानंतर खून करून महिलेला जाळल्याच्या प्रकरणात आरोपींना पेट्रोलची विक्री करणाऱ्या वितरकावर गुन्हा दाखल करण्यासाठी कायदेशीर मत अजमावले जात आहे.

चार आरोपींनी या महिलेवर बलात्कार क रताना तिचे तोंड दाबून धरले होते तसेच तिला बांधून ठेवले होते. त्यामुळे गुदमरल्याने तिचा मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी जवळपासच्या पेट्रोलपंपावर जाऊन बाटलीत पेट्रोल आणले होते. नंतर त्यांनी ते पेट्रोल वापरून तिला  जाळून टाकले होते.  ही घटना तेलंगणातली असून याच राज्यात महिला तहसीलदारास कार्यालयात जाऊन पेट्रोल ओतून जिवंत जाळण्यात आले होते. २७ वर्षे वयाच्या पशुवैद्य महिलेवर २७ नोव्हेंबर रोजी तोंडापल्ली टोल प्लाझा येथील परिसरात चार ट्रक चालकांनी बलात्कार केला होता. त्यानंतर तिला ठार करून त्यांनी तिचा मृतदेह पेट्रोल ओतून  जाळून टाकला होता. तो जळालेला मृतदेह २८ नोव्हेंबरला सकाळी सापडला. सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही.सी.सज्जनार यांनी सांगितले की, सदर आरोपींना पेट्रोल विक्री कुठल्या परिस्थितीत करण्यात आली याचा तपास चालू आहे. त्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी मत अजमावण्यात येत आहे. आरोपी प्रथम एका पेट्रोल पंपावर गेले होते. तेथे त्यांना बाटलीत पेट्रोल देण्यात आले नाही. नंतर ते दुसऱ्या पेट्रोल पंपावर गेले असता त्यांना बाटलीत पेट्रोल देण्यात आले.

दरम्यान पेट्रोलियम वितरक संघटनेचे सहसचिव राजीव अमाराम यांनी सांगितले की, पेट्रोल पंपांना मर्यादित प्रमाणात पेट्रोल विक्री करण्यास परवानगी आहे. बाटलीत पाच लिटर पेट्रोल व कॅनमध्ये २०० लिटर डिझेल दिले जाऊ शकते. पण आता बाटलीत किंवा प्लास्टिक कॅनमध्ये पेट्रोल किंवा डिझेल देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कारण याआधी तहसीलदार महिलेला तिच्या कार्यालयात जाऊन अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्यात आले होते. या  तहसीलदार महिलेचे नाव विजया रेड्डी होते. तीस वर्षांची ही महिला जागीच मरण पावली होती.

आरोपींना पोलिस कोठडी मिळण्यासाठी प्रयत्न

येथे पश चिकित्सक महिलेवर बलात्कार करून तिला जाळून टाकणाऱ्या चार आरोपींना पोलीस कोठडी मिळावी यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. सध्या या चार जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी जिल्हा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी सुनावली आहे. त्यांनी शाडनगर पोलीस ठाण्यात उपस्थित राहून या चौघांना न्यायालयीन कोठडी दिली, कारण आरोपींना न्यायालयात हजर करणे शक्य नव्हते. पोलीस ठाण्यासमोर निदर्शक मोठय़ा संख्येने जमा झाले होते.  त्यामुळे आरोपींना न्यायालयात नेण्याऐवजी न्यायाधीश पोलीस ठाण्यात आले होते.  शनिवारी आरोपींना हैदराबाद तुरुंगात नेत असताना पोलीस ठाण्यावर दगडफेक करण्यात आली.आरोपींना पोलीस कोठडी देण्यात यावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह शाडनगर भागात २८ नोव्हेंबरला  सकाळी सापडला होता. पुढील चौकशीसाठी आरोपींची पोलीस कोठडी घेण्यासाठी प्रयत्न करू असे वरिष्ठ अधिकारी म्हणाले.

तक्रार घेण्यास दिरंगाई करणारे तीन पोलीस निलंबित

दिल्लीत २०१२ मध्ये  झालेल्या निर्भयाकांडाची आठवण करून देणाऱ्या घटनेत हैदराबादमधील पशु चिकित्सक महिलेवर सामूहिक बलात्कार करून जाळल्याच्या प्रकरणात प्राथमिक माहिती अहवाल नोंदवण्यात दिरंगाई केल्याच्या आरोपावरून तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. वृत्तवाहिन्यांना या घटनेतील आरोपींचा रिमांड अहवाल मिळाला असून त्यातून धक्कादायक माहिती सामोरी आली आहे.

रिमांड अहवालात असे म्हटले आहे, की या आरोपींपैकी एक जण ट्रक चालक असून त्याच्याकडे दोन वर्षांपासून परवाना नाही. त्याचा ट्रक एक दिवसापूर्वीच अडवण्यात आला होता कारण त्याच्याकडे कागदपत्रे नव्हती पण ट्रक जप्त करण्यात आला नाही कारण ट्रकचालकाने त्याची केबलच काढून घेतली. या प्रकरणात महिलेच्या कुटुंबीयांना एका पोलिस ठाण्यावरून दुसरीकडे पाठवले गेले. त्यांनी तक्रार देण्याचे प्रयत्न रात्री दहा वाजता सुरू केले होते पण पहाटे तीन वाजता तक्रार घेतली गेली.