सीबीआय प्रमुखपदी नागेश्वर राव यांच्या हंगामी नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणीतून सरन्यायाधीश रंजन गोगई यांनी अंग काढून घेतले आहे. मी २४ जानेवारी रोजी नवीन सीबीआय प्रमुख निवडण्याच्या समितीत आहे. त्यामुळे मी या खटल्याची सुनावणी करू शकत नाही. गुरूवारी याप्रकरणी दुसरे पीठ याची सुनावणी करेल, असे गोगई यांनी स्पष्ट केले आहे.

कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थेकडून याप्रकरणी त्वरीत सुनावणी व्हावी यासाठी दाखल केलली याचिका फेटाळत न्यायालयाने त्यांना आज सुनावणीची तारीख दिली होती. याचिकेत राव यांच्या नियुक्तीबरोबर सीबीआयमध्ये होणाऱ्या नियुक्तीत पारदर्शकतेचे अपील करण्यात आले होते. याचिकाकर्त्यांचे वकील म्हणून प्रशांत भूषण हे काम पाहत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अटींसह आलोक वर्मा यांना प्रमुखपद बहाल केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आलोक वर्मा यांना संचालकपदावरून हटवण्यात आले. पदावरून हटवल्यानंतर वर्मा यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राव यांना पुन्हा एकदा हंगामी प्रमुखपद देण्यात आले होते.

२४ जानेवारीला नवीन सीबीआय प्रमुखांच्या नियुक्तीसाठी समितीची बैठक होणार आहे. या समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि सरन्यायाधीश रंजन गोगई सहभागी होतील. मागील काही महिन्यांपासून सीबीआयमध्ये सुरू असलेला वाद रोखण्याचा प्रयत्न करताना सरकारने नागेश्वर राव यांना हंगामी संचालकपदी नियुक्त केले. मात्र, राव यांच्या नियुक्तीवरही काही सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.