भारत व चीन या देशात हवा प्रदूषणापासून संरक्षणासाठी अनेक लोक कापडाचे महागडे मास्क वापरतात, पण प्रत्यक्षात त्यांचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे प्रदूषणापासून लोकांचे संरक्षण होत नाही, केवळ खोटी सुरक्षिततेची भावना निर्माण होते असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.

प्रत्यक्षात वैज्ञानिकांनी नेपाळमध्ये या मास्कच्या उपयुक्ततेबाबत संशोधन केले असून तेच मास्क चीन व भारतात वापरले जात असल्याने तो निष्कर्ष या देशांनाही लागू असल्याचे म्हटले आहे. मॅसॅच्युसेट्स अमहर्स्ट विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की, आशिया व आग्नेय आशियात हवा प्रदूषणापासून संरक्षणासाठी धुता येणारे कापडी मास्क किंवा शस्त्रक्रिया करताना डॉक्टर्स वापरतात ते मास्क लोक वापरतात त्यामुळे हवेतील प्रदूषकांचे बारीक कण फुफ्फुसात जाण्यापासून संरक्षण होते असे म्हटले जाते, काही प्रमाणात ते खरे असले तरी कापडी मास्कमुळे बाजारपेठेत असलेल्या इतर मास्कच्या तुलनेत प्रदूषणापासून फार कमी संरक्षण मिळते. विकसनशील देशात या मास्कमुळे हवाप्रदूषणापासून संरक्षण होते अशी ठाम समजूत आहे. जास्त प्रदूषण असलेल्या भागात लोकांना या मास्कच्या वापरात सुरक्षितता वाटते असे मॅसॅच्युसेट्स विद्यापीठाचे रीचर्ड पेल्टीयर यांनी म्हटले आहे. हवा दर्जा संशोधन प्रकल्पात नेपाळमधील लोकांना फेरवापराच्या कापडी मास्कमुळे संरक्षण मिळत नाही असे म्हटले आहे. काठमांडूत गॅसोलिन व डिझेलचा वापर, टायर व कचरा जाळणे यामुळे प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे.

पेल्टियर यांनी सांगितले की, हे मास्क कितपत उपयोगी असतात याबाबत फारसे संशोधन झालेले नाही. प्रमाणित औद्योगिक सुरक्षा मास्क एन ९५ हा सुरक्षित उपाय असला तरी अनेक विकसनशील देशात हे मास्क उपलब्ध नाहीत व असले तरी ते महाग आहेत. फेरवापराच्या कापडी मास्कची किंमत कमी असते, ते धुता येतात व अनेक महिने तोंडावर बांधता येतात हे खरे असले तरी त्यांचा प्रदूषणापासून वाचण्यासाठी फार उपयोग होत नाही. शंकू आकाराचा कापडी मास्क, सर्जिकल मास्क, दोन साधे कापडी मास्क यांचा प्रयोगात उपयोग करून त्यांची उपयुक्तता तपासण्यात आली. त्यात डिझेल व इतर इंधनाच्या ज्वलनातून बाहेर पडणाऱ्या कणांपासून लोकांना संरक्षण मिळते का, याचा वास्तव पातळीवर विचार करण्यात आला.

कापडी मास्कला जर एक्झॉस्ट व्हॉल्व असेल तर ते चांगले काम करतात व त्यात ८०-९० टक्के कृत्रिम कण तर डिझेल ज्वलनातील ५७ टक्के कण गाळले जातात. साध्या कापडी मास्कमुळे फार थोडा फायदा होतो त्यात २.५ मायक्रोमीटर इतक्या सूक्ष्म आकाराच्या प्रदूषक कणांपासून संरक्षण मिळत नाही. ३०,१०० व ५०० नॅनोमीटर तसेच १ व २.५ मायक्रोमीटरचे केवळ ३९-६५ टक्के कण साध्या कापडी मास्कने रोखले जातात. डिझेलच्या ज्वलनातून तयार झालेले कण कुठल्याच मास्कने फारसे रोखता येत नाहीत. पेल्टियर यांनी सागितले की, आमचे संशोधन नेपाळमध्ये केलेले असले तरी तेथील मास्कच मोठय़ा प्रमाणात चीन, भारत, आग्नेय आशिया तसेच नैऋत्य आशियात वापरले जातात. त्यामुळे या देशातही कापडी मास्कचा फारसा प्रभावी परिणाम प्रदूषणापासून वाचण्यासाठी दिसत नाही. जर्नल ऑफ एक्सपोजर सायन्स अँड एनव्हरॉनमेंटल एपिडिमिऑलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.