यूपीएससीत घसरलेल्या मराठी टक्क्य़ावर चिंता व्यक्त करणाऱ्या सरकारच्या निष्क्रियतेचा उत्तम नमुना समोर आला आहे. यूपीएससीच्या अंतिम मुलाखतीसाठी दिल्लीत येणाऱ्या मराठी उमेदवारांची पूर्वतयारी करवून घेण्याच्या उद्देशाने   दिल्लीस्थित सहा वरिष्ठ मराठी अधिकाऱ्यांनी २००८मध्ये सुरु केलेला ‘षटकार क्लब’ हा उपक्रम राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे बंद पडला आहे. मुलाखतीसाठी दिल्लीत येणाऱ्या उमेदवारांची निवासाची सोय करण्यापासून ते त्यांची कागदपत्रे साक्षांकित करून देण्यापर्यंत हे मराठी अधिकारी धडपडत होते. २०१२मध्ये खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा उपक्रम सरकारतर्फे राबविण्याचा निर्णय घेतला खरा, पण पुढे लालफितीच्या कारभारामुळे हा उपक्रम बंद पडला.
कधीकाळी दिल्लीत मुलाखतीसाठी आल्यानंतर स्वत: भोगलेला त्रास इतरांच्या वाटय़ाला येऊ नये, म्हणून या सहा मराठी अधिकाऱ्यांनी हा अभिनव उपक्रम सुरु केला. मराठी उमेदवारांना निवारा, मुलाखतीची रंगीत तालीम, सर्व प्रकारची वृत्तपत्रे, मासिके आदी सुविधा पुरवल्या जात असत. या सहा जणांनी ७५ अधिकाऱ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतले. महाराष्ट्र सरकार यूपीएससीसाठी मुलाखतीला येणाऱ्या कुणाही विद्यार्थ्यांच्या पालकांची निवास व्यवस्था करीत नाही. पालकांच्या निवासाची ही जबाबदारी ‘षट्कार क्लब’च घेत असे.
वेळप्रसंगी आर्थिक झळ सोसून या सहा अधिकाऱ्यांनी हा उपक्रम कसाबसा सुरु ठेवला. सहा अधिकाऱ्यांपैकी काहीजणांची बदली झाली. तरीही हा उपक्रम कसाबसा सुरू होता. २०१२मध्ये मुख्यमंत्री चव्हाण यांना या उपक्रमाची माहिती मिळाल्यावर त्यांनी ‘षट्कार क्लब’च्या उपक्रमाला सरकारी मंजुरी देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतुदीची तयारीही त्यांनी दाखविली होती.  चव्हाण यांनी आदेश देऊनही हा उपक्रम केवळ कागदावरच राहिला. गेल्या सहा महिन्यांपासून या उपक्रमाची फाइल मंत्रालयात धूळ खात पडून आहे. दोन वर्षांपासून मुलाखतीसाठी दिल्लीत आलेल्या मराठी विद्यार्थ्यांना सरकारी यंत्रणेकडून अत्यंत वाईट अनुभव आल्याची भावना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.

अंतिम मुलाखतीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक कागदपत्रांच्या साक्षांकित (अटेस्टेशन) प्रती सादर कराव्या लागतात. दिल्लीत जिथे एखाद्या मंत्र्यालयात प्रवेश करणे अवघड असते अशा ठिकाणी त्यांना त्या कोण करून देणार? एखाद्या अधिकाऱ्यांना बोलावले तरी तो तासभर बसवून ठेवणार. वेळ तर जायचाच शिवाय होणाऱ्या धावपळीमुळे उमेदवाराच्या मनस्थितीवर वाईट परिणाम व्हायचा. हा सर्व त्रास आम्ही सहन केला होता. तो या मुलांना होऊ नये, म्हणून हा षटकार क्लब अस्तित्वात आला.
उन्मेष वाघ, प्रवर्तक, षटकार क्लब

‘षटकार क्लब’चा पहिल्याच वर्षी ८९ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. सतत विद्यार्थ्यांची संख्या वाढत होती. या उपक्रमाच्या सरकारीकरणाचा निर्णय मुख्यमंत्री चव्हाण यांनी २०१२ मध्ये घेतला. राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागास दिल्लीत यूपीएससीच्या अंतिम मुलाखतीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आजपर्यंत या विभागाने प्रस्ताव बनवण्यापलीकडे काहीही केलेले नाही. सरकारीकरणाच्या नादात दिल्लीतला एक विधायक उपक्रम सरकारनेच बंद पाडल्याची हळहळ व्यक्त होत आहे.