केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी शनिवारी जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या नेत्या आइषी घोष यांची भेट घेतली. जेएनयूमधील शुल्कवाढ आणि सुधारित नागरिकत्व कायदा या विरोधात पुकारलेल्या आंदोलनाला संपूर्ण देशाचा पाठिंबा असल्याचे विजयन म्हणाले.

नवी दिल्लीतील केरळ हाऊस येथे विजयन यांनी घोष यांची भेट घेतली आणि आंदोलनाला पाठिंबा दिला, इतकेच नव्हे तर सुधन्वा देशपांडे लिखित ‘हल्ला बोल : द डेथ अ‍ॅण्ड लाइफ ऑफ सरदार हाश्मी’ हे पुस्तकही विजयन यांनी घोष यांना भेट दिले.

जेएनयूमधील विद्यार्थी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ  आणि संघ परिवाराविरुद्ध मोठे युद्ध लढत आहेत, बळाचा वापर करून बंडाचा आवाज थंड करण्याची संघ परिवाराला अपेक्षा आहे, मात्र विद्यार्थ्यांनी कोणतीही तडजोड न करता लढा सुरू ठेवला आहे, असे विजयन यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

जेएनयू हिंसाचार : ३७ विद्यार्थ्यांची ओळख पटली

नवी दिल्ली : जेएनयू संकुलात ५ जानेवारी रोजी हिंसाचाराचा उद्रेक झाला त्या वेळी व्हॉट्सअ‍ॅपवर एक गट तयार करण्यात आला होता त्यामधील ३७ विद्यार्थ्यांना पोलिसांनी ओळखले आहे, असे सूत्रांनी सांगितले. ओळख पटविण्यात आलेले विद्यार्थी कोणत्याही (डाव्या अथवा उजव्या) संघटनेशी संबंधित नव्हते. या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सत्र नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याची मागणी होती आणि त्यांना त्यासाठी प्रवेश हवा होता, असेही सूत्रांनी सांगितले. जेएनयूमधील हिंसाचाराच्या वेळी युनिटी अगेन्स्ट लेफ्ट हा व्हॉट्सअ‍ॅप गट तयार करण्यात आला होता, असा पोलिसांचा कयास होता त्याची छाननी करण्यात आली.