News Flash

मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याने मराठी प्रवाशांना महाराष्ट्र सदनात निवारा 

माझा भाऊ पाठिशी उभा असल्यासारखे वाटले, अशा शब्दांत एलिझाबेथ यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आल्यावर आनंद व्यक्त केला.

संग्रहित छायाचित्र

मुलुंडच्या एलिझाबेथ पिंगळे यांच्या चित्रफितीनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन; सदनात इटलीहून परतलेल्या १५ विद्यार्थ्यांचा समावेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला मदत केल्यामुळे आता मी महाराष्ट्रात सदनात राहायला आले आहे. मला मुंबईला कधीही जायला मिळो, मला आत्ताच घरी आल्यासारखे वाटू लागले आहे.. मूळच्या मुलुंडच्या रहिवासी असलेल्या पण, करोनाच्या विलगीकरणामुळे दिल्लीतच राहाव्या लागलेल्या एलिझाबेथ पिंगळे यांची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया.

एलिझाबेथ यांच्या चित्रफितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने दखल घेतली आणि त्यांनी थेट एलिझाबेथ यांना फोन लावला. ताई, तुम्ही काळजी करू नका, तुमची सगळी जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. माझा भाऊ पाठिशी उभा असल्यासारखे वाटले, अशा शब्दांत एलिझाबेथ यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आल्यावर आनंद व्यक्त केला.

एलिझाबेथ या आजारी असलेल्या वडिलांना बघायला इस्राइलला गेल्या होत्या. तिथे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्या २२ मार्च रोजी दिल्लीत परतल्या. त्याच दिवशी त्या मुंबईला जाणार होत्या. पण, परदेशातून आलेल्या प्रवाशांचे १४ दिवसांसाठी विलगीकरण करण्यात आल्याने त्यांना दिल्लीतील हॉटेलमध्ये राहावे लागले. पण, हॉटेल बंद करण्यात आल्याने एलिझाबेथ यांच्यासह महाराष्ट्रातील ४० रहिवाशांपुढे निवासाची समस्या निर्माण झाली होती. एलिझाबेथ यांनी ही समस्या चित्रफितीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवली.

एलिझाबेथ यांच्या विलगीकरणाचा कालावधी संपला असल्याने केंद्रीय आरोग्य विभागाने त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली आहे. मात्र, टाळेबंदीमुळे त्यांना मुंबईला जाता येत नसल्याने या सर्व प्रवाशांची सोय सदनात करण्यात आली आहे. त्यात इटलीहून आलेले १५ विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याची माहिती सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 12:37 am

Web Title: cm takes care of marathi travelers in maharashtra house abn 97
Next Stories
1 करोनाचा फैलाव हवेतून नाही!
2 माजी राष्ट्रपती-पंतप्रधान, विरोधकांशी मोदींची चर्चा
3 कानपूरमधील सहा ठिकाणे रेड झोन
Just Now!
X