काँग्रेस सरचिटणीस पद आणि उत्तर प्रदेशमध्ये महत्वाची जबाबदारी मिळाल्यानंतरही प्रियंका गांधी या अद्याप संपूर्ण राज्याचा दौरा करु शकलेल्या नाहीत. पण लवकरच होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ते एक अभियान सुरू करण्याची योजना बनवत असून त्यासाठी एका टीमचीही उभारणी करत आहेत. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखालील सिटीजन फॉर अकाऊंटेबल गव्हर्नन्स (सीएजी) आणि इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीचे (आय-पीएसी) सहसंस्थापक म्हणून काम पाहिलेले रॉबिन शर्मा आता प्रियंका गांधी यांचे व्यवस्थापक म्हणून काम पाहतील.
रॉबिन शर्मा हे वर्ष २०१४ मधील लोकसभा निवडणूक प्रचारावेळी नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ या अभियानाचे प्रमुख होते. त्याचबरोबर वर्ष २०१५ मध्ये आय-पीएसीअंतर्गत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सायकल अभियान ‘हर घर नितीश, हर मन नितीश’ची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये मध्ये राहुल गांधी यांच्या ‘खाट सभे’चेही नियोजन आय-पीएसी अंतर्गत शर्मा यांनीच पाहिले होते.
दरम्यान, रॉबिन शर्मा हे नंतर आय-पीएसीतून बाहेर पडले आणि मागील महिन्यापासून ते स्वतंत्ररित्या प्रियंका गांधी यांचे प्रचार व्यवस्थापक बनले आहेत. त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांच्याशी अनेकवेळा बैठकाही घेतल्या आहेत. ‘इकॉनॉमिक टाइम्स’नुसार, प्रियंका यांच्या टीममध्ये सामील होणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने वरद पांडे यांचाही समावेश आहे. पांडे हे यूपीए सरकारमधील माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांचे विशेष सल्लागार होते.
हॉवर्ड विद्यापीठातून उत्तीर्ण झालेले पांडे हे यूपीए कार्यकाळात प्रधानमंत्री ग्रामीण विकास कार्यक्रम, निर्मल भारत अभियान, आधारच्या अनेक योजनांशी निगडीत अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. प्रियंका गांधी यांच्याबरोबर काम करण्यासाठी ते पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये परतले आहेत.