दिल्लीतील पतियाला हाऊस न्यायालयाने कोळसा घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस नेते व उद्योजक नवीन जिंदाल आणि अन्य १४ जणांना जामीन मंजूर केला आहे. १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि हमीपत्रावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

झारखंडमधील अमरकोंडा मुर्गदगल कोळसा खाणवाटपात गैरव्यवहार झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सोमवारी दिल्लीतील पतियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली. विशेष न्यायाधीश भारत पराशर यांच्या न्यायालयात प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने नवीन जिंदाल यांच्यासह जिंदाल स्टील आणि पॉवर लिमिटेडचे सल्लागार अनंत गोयल, मुंबई एस्सार पॉवर लिमिटेडचे उपाध्यक्ष सुशीलकुमार मारु, निहार स्टॉक्स लिमिटेडचे संचालक बीएसएन सुर्यनारायणन, मुंबईतील केई इंटरनॅशनलचे मुख्य वित्त अधिकारी राजीव अग्रवाल आणि गुरुग्राममधील ग्रीन इन्फ्राचे सिद्धार्थ माद्रा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. एकूण १४ जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.