स्टेट बॅंक ऑफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वांत मोठ्या बॅंकेसह २३ बॅंका आणि विमा कंपन्यांमध्ये काळ्या पैशाचे पांढऱया पैशात रुपांतर करण्यात येत असल्याचा आरोप कोब्रापोस्ट या वृत्तसंकेतस्थळाने सोमवारी केला.  संकेतस्थळाचे संपादक अनिरुद्ध बहल यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली.
या बॅंका आणि विमा कंपन्यांमध्ये कशा पद्धतीने काळ्या पैशांचे पांढऱयात रुपांतर केले जाते, याची माहिती कोब्रापोस्टने स्टिंग ऑपरेशनच्या साह्याने सोमवारी पत्रकार परिषदेत उघड केली. याआधी कोब्रापोस्टने एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि ऍक्सिस बॅंकेवर याच पद्धतीचे आरोप केले होते. रिझर्व्ह बॅंकेकडून त्यांची चौकशी सध्या सुरू आहे.
पंजाब नॅशनल बॅंक, कॅनरा बॅंक, आयडीबीआय, बॅंक ऑफ बडोदा, देना बॅंक, इंडियन ओव्हरसिज बॅक इत्यादी बॅंकावर आरोप करण्यात आले आहेत. या बॅंका रिझर्व्ह बॅंकेची मार्गदर्शक तत्त्वे, केवायसी आणि फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्टच्या (फेमा) नियमांचे उल्लंघन करीत आहेत, असे कोब्रापोस्टने म्हटले आहे. ग्राहकांकडील रोख स्वरुपातील काळा पैसा बॅंकांशी संबंधित विमा कंपन्यांमध्ये गुंतवून तो पांढरा केला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. एलआयसी या सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या विमा कंपनीकडूनही काळ्या पैशांचे पांढऱयात रुपांतर केले जात असल्याचे कोब्रापोस्टने म्हटले आहे.