हरयाणामध्ये धुक्यामुळे ५० गाडय़ांची टक्कर; ७ मृत्युमुखी

नवी दिल्ली : अतिशीत लहरींनी संपूर्ण उत्तर भारत व्यापला असून हरयाणामध्ये सोमवारी दाट धुक्यामुळे ५० गाडय़ा एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या ११ वर्षांतील सर्वाधिक कमी तापमान रविवारी रात्री नोंदविण्यात आले. सोमवारी पहाटे उणे ६.८ अंश सेल्सियस इतके तापमान श्रीनगरमध्ये नोंदविण्यात आले. प्रसिद्ध दल लेक गोठले आहे. अमृतसर शहराचे तापमान सकाळी १.१ अंश सेल्सियस इतके होते, तर राजधानी दिल्लीमध्ये ४.६ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदविले गेले.

हरयाणाच्या झज्जर जिल्ह्य़ात सोमवारी दाट धुक्याने दृश्यमानता कमी झालेली असताना एक जीप मालमोटारीवर धडकून झालेल्या अपघातात सात जण ठार झाले. यानंतर अनेक वाहने एकमेकांवर जाऊन आदळली. हा अपघात रोहतक-रेवारी महामार्गावर सोमवारी सकाळी झज्जर बायपासवर घडला.

मुंबईत मात्र नाताळ थंडीविनाच!

मुंबई : शहरातील किमान तापमानासह कमाल तापमानचा पाराही घसरत थंडीची कडाका वाढत असतानाच शनिवारपासून मात्र कमाल आणि किमान तापमान पुन्हा वाढले. आग्नेय दिशेने येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने तापमान वाढले. पुढील दोन ते दिवस ही तापमान वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदा नाताळातही थंडीची मजा अनुभवता येणार नाही. सोमवारी कुलाबा येथे ३०.८ अंश.से. कमाल तापमान होते, तर सांताक्रूझ येथे ३३.१ अंश.से. नोंदले. किमान तापमान सांताक्रूझ येथे १८.८ अंश.से. नोंदले गेले असून कुलाबा येथे २१.५ अंश.से. होते.