घरी शौचालय बांधावे या हट्टाकडे आईवडिलांनी लक्ष न दिल्यामुळे झारखंडमधील एका महाविद्यालयीन तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली.
डुमका शहरातील शास्त्रीनगर भागात गोशाळा मार्गावर राहणाऱ्या आणि बी.ए. प्रथम वर्षांत शिकणाऱ्या १७ वर्षे वयाच्या खुबू कुमारी हिने शुक्रवारी स्वत:च्या घरी छताला फाशी लावून घेतली. त्या वेळी तिची आई शेतावर कामाला गेली होती, तर ट्रकचालक असलेले वडील बाहेरगावी गेले होते. लग्नाचा प्रस्ताव येण्यापूर्वी आपल्या घरी शौचालय बांधण्यात यावे, असा खुबू हिचा आग्रह होता; परंतु पैशांची अडचण असल्यामुळे शौचालयाचे बांधकाम करणे व तिचे लग्न करून देणे आम्हाला शक्य नव्हते, असे तिची आई संजूदेवी यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले, तर डुमकाचे उपायुक्त राहुल सिन्हा यांनी या घटनेची स्वत:हून दखल घेत पोलिसांना या प्रकरणाचा तपास करून दोषी व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यास सांगितले.
स्वच्छता अभियान सुरू असताना आणि महिलांसाठी शौचालय बांधण्याचा प्रचार होत असताना ही घटना सर्वाचे डोळे उघडणारी आहे, असे पोलीस उपमहानिरीक्षक डी.बी. शर्मा म्हणाले, तर सिन्हा यांनी या घटनेचे वर्णन ‘अत्यंत क्लेशदायक’ असे केले.