अनेकदा उन्हाळ्यात घराचे छप्पर तापते त्यामुळे वरच्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबांना नेहमीच जास्त त्रास सहन करावा लागतो. मोटारींचे छत तापल्यानेही त्रास होतो, त्यात वातानुकूलन यंत्रणा असली तरी थंडपणा निर्माण करण्यासाठी जास्त ऊर्जा लागते  पण आता त्यावर उपाय म्हणून धातूच्या पृष्ठभागांवर लावता येईल असा काचेपासून बनवलेला रंग वैज्ञानिकांनी तयार केला आहे.
हा रंग पर्यावरणस्नेही व कमी खर्चिक आहे.
जॉन्स हॉपकीन्स विद्यापीठातील अ‍ॅप्लाईड फिजिक्स लॅबचे जॅसन जे बेनकोस्की यांनी सांगितले की, अनेक  मोटारी व घरांमध्ये असे बहुलकांवर (पॉलिमर) आधारित रंग वापरले जातात, त्यामुळे अतिनील किरणांचा फटका कमी बसतो. बेनकोसकी यांच्या मते आतापर्यंत आपण विविध रंगांचे बहुलक वापरून उष्णतेपासून संरक्षण केले जात असे पण त्यामुळे पर्यावरणाची हानी होते, हे टाळण्यासाठी आपण पारंपरिक बहुलकांच्या ऐवजी अकार्बनी काचेच्या थराचा वापर करण्याची कल्पना काढली. ही काच सिलिकाची बनवलेली असून त्याचा थर जर छताला किंवा मोटारींच्या पत्र्याला दिला तर तो कडक होऊन टिकतो व त्याचे प्रकाशीय गुणधर्म वेगळे असतात पण काही प्रमाणात हा रंग ठिसूळ आहे. नवीन आवरणात सिलिका वापरली जाते ती पृथ्वीवर मोठय़ा प्रमाणात आहे. पोटॅशियम सिलिकेट हे पाण्यात विद्राव्य आहे व त्यामुळे त्याचा थर दिल्यानंतर ते कोरडे होते व जलावरोधक बनते. अ‍ॅक्रिलिक, पॉलियुरेथेन, किंवा इपॉक्सी पेंट यांच्यापेक्षा हा काचेचा रंग वेगळा असतो व तो कार्बनी पदार्थाचा बनलेला नसतो. सिलिकेटचा थर जास्त काळ टिकतो व तसेच त्याला तडे जात नाहीत कारण धातूच्या आकुंचन प्रसरणानुसार तो आकारही बदलतो. सिलिकेटची रंगद्रव्ये असल्याने या रंगाच्या आवरणाला सूर्यप्रकाश परावर्तित करण्याचा गुणधर्म असतो, त्यामुळे उष्णता बाहेर फेकली जाते, सूर्यप्रकाश शोषला जात नसल्याने हा रंग हवेच्या तापमानाला किं वा त्यापेक्षा कमी तापमानाला तो राहतो. जेव्हा एखाद्या वस्तूचे तापमान वाढते तेव्हा त्याचे आयुष्यमान कमी होते त्यामुळे काचेच्या रंगाने वस्तू जास्त टिकते. अ‍ॅल्युमिनियम सूर्यप्रकाशात ७० अंश फॅरनहीट इतके तापते, हे तापमान सभोवतीच्या तापमानापेक्षा जास्त असते म्हणजे त्यावर या नवीन रंगाचे आवरण दिल्यास ते तापत नाही व हवेच्या तापमानाला राहते, त्याचे क्षरण होत नाही. नौदलाच्या जहाजांसाठी बेनकोस्की यांच्या प्रयोगशाळेने हे रंग बनवले होते पण त्याचे अनेक व्यावसायिक उपयोग आहेत. घराचे छप्पर जर या रंगाने रंगवले तर उन्हाळा कमी जाणवेल व वातानुकूलनासाठी होणाऱ्या
ऊर्जा खर्चात कपात होईल. दोन वर्षांत या रंगाच्या आणखी चाचण्या घेऊन तो प्रगत स्वरूपात सादर केला जाईल असे बेन्कोस्की यांनी सांगितले.

काचेचा रंग
’धातूवर आवरण देता येते
’छपरासही त्याचा थर देणे शक्य
’तापमान कमी झाल्याने वातानुकूलन खर्च कमी होतो
’सिलिकाचा वापर असल्याने किफायतशीर