अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा आयआयएममधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक कलपरीक्षण चाचणी (कॉमन अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट – कॅट) या परीक्षेत गतवर्षी ८० उमेदवारांच्या गुणांमध्ये फेरफार झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची घोषणा मानव संसाधन विकास मंत्रालयाने केली आहे. अधिकृत संकेतस्थळावर फेरफार झाले असल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी लखनौ येथील वेब वेव्हर्स या कंपनीची आहे, असे स्पष्टीकरण आयआयएम – कोझिकोडेने दिले.
अज्ञात व्यक्तीने दूरध्वनीद्वारे दिलेल्या माहितीची शहानिशा कॅट परीक्षेच्या समन्वयकांमार्फत करून तातडीने त्रुटींबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे, असे आयआयएमतर्फे स्पष्ट करण्यात आले. तसेच कॅट परीक्षेतील गुण प्रमाण मानून प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या आयआयएम व्यतिरिक्तच्या अन्य शैक्षणिक संस्थांनाही याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
आयआयएमतर्फे सर्व उमेदवारांचे कॅट परीक्षेचे गुण सर्व संस्थांकडे पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी जो कोणी गुन्हेगार असेल त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील, अशी हमी आयआयएमने दिली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून संगणकाची हार्ड डिस्क जप्त केली आहे. आयआयएमचे कॅट परीक्षेचे समन्वयक प्रा. एस.एस.एस. कुमार यांचीही चौकशी करण्यात आली आहे.