दुर्गादेवीचे स्मरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी महिलांचे सक्षमीकरण व सुरक्षितता याबाबत सरकारच्या असलेल्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला.

पश्चिम बंगालमधील सर्वात मोठा उत्सव असलेल्या दुर्गापूजेनिमित्त जनतेशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले, की करोना महासाथीच्या काळात हा सण मर्यादित प्रमाणावर साजरा केला जात असला, तरी लोकांचा उत्साह अद्याप अमर्याद आहे.

दुर्गादेवीची ‘शक्तीचे प्रतीक’ म्हणून पूजा केली जात असल्याचा उल्लेख करतानाच, आपले सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी सतत प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

‘२२ कोटी महिलांसाठी जनधन खाती उघडणे, मुद्रा योजनेंतर्गत त्यांना कर्जे देणे, ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’ उपक्रम सुरू करणे, सशस्त्र दलांमध्ये महिलांना स्थायी नियुक्ती देणे आणि १२ ते २६ आठवडय़ांपर्यंतची मातृत्व रजा देणे यांसारखी अनेक पावले आम्ही त्यांच्या सक्षमीकरणासाठी उचलली आहेत’, असे भाजपने दुर्गापूजेनिमित्त आयोजित केलेल्या दुर्गापूजा समारंभासाठी जमलेल्या नागरिकांना उद्देशून मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान म्हणाले.. : महिलांच्या सुरक्षिततेबाबत आम्ही जागरूक आहोत. बलात्कारविरोधी कायदे कठोर करण्यात आले असून, आता गुन्हेगारांसाठी मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे, याचाही मोदी यांनी उल्लेख केला. हाथरसच्या घटनेसह महिलांवर बलात्कार व खून यांच्या अनेक घटना देशात घडल्याच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधानांनी हे वक्तव्य केले आहे.