काँग्रेसचे धोरण हे भाजपच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याचे आहे. भाजपची विजयी घोडदौड त्यांना बघवत नाही म्हणून ते आमच्या नावाने बोटे मोडतात अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भरूच या ठिकाणी केली. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज भरूचमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली त्यावेळी ते बोलत होते.

उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कमळ फुलले. असाच निकाल गुजरात विधानसभा निवडणुकांमध्येही लागणार आहे असा आत्मविश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केला. भाजपला देशाचा आणि त्यातील राज्यांचा विकास साधायचा आहे आणि काँग्रेसला विकासाच्या मार्गात खोडा घालणेच ठाऊक आहे अशीही खोचक टीका त्यांनी केली. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

देशावर गेली अनेक वर्षे काँग्रेसची सत्ता होती. उत्तर प्रदेशातही काँग्रेसची सत्ता होती. मात्र त्या काळात देशाचा आणि राज्यांचा विकास काय आणि कसा झाला? याचे काही उत्तर काँग्रेसकडे आहे का? गुजरातकडे पाहिले तर विकास कसा होऊ शकतो याची साक्ष पटते. स्वतः काहीही करायचे नाही आणि आम्ही विकासाच्या मार्गाने चाललो असताना आमच्यावर टीका करायची हे काँग्रेसचे धोरण आहे.

आम्ही बुलेट ट्रेन घेऊन येतो आहे त्याचाही काँग्रेसला पोटशूळ उठला आहे. ज्यांना बुलेट ट्रेनचा त्रास होतो आहे त्यांनी खुशाल बैलगाडीने प्रवास करावा विकास हा आमचा अजेंडा आहे आणि त्यावर आम्ही काय राहणार असा पुनरूच्चारही त्यांनी केला.

काँग्रेसमधील घराणेशाहीमुळे मागील ७० वर्षांमध्ये देशाचे वाटोळे झाले. काँग्रेसने गुजरातमध्ये फूट पाडण्याचा आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद या जोरावर त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. त्यामुळे गुजरातची जनता पुन्हा भाजपलाच निवडून देईल याची खात्री वाटते असेही मोदी यांनी म्हटले आहे.