पाळीव प्राण्यांच्या दुकानामधून अचानक गायब झालेला एक पोपट व्हॉट्सअ‍ॅपमुळे त्याच्या मालकाला अवघ्या ४८ तासांमध्ये परत मिळाला आहे. ‘काँगो ग्रे’ या पोपटाची किंमत सुमारे ५० हजार रुपये इतकी आहे.

बंगळुरूच्या एचएएल बाजारपेठेतील फिन्स फर फेदर या दुकानाचे मालक प्रदीप यादव यांनी शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी सकाळी दुकान उघडले तेव्हा त्यांना या पोपटासह १६ पक्षी गायब असल्याचे आढळले. विशेष म्हणजे चोरांनी रोख रक्कम अथवा अन्य महागडय़ा वस्तूंना हातही लावला नव्हता, अन्य एका पिंजऱ्यात असलेले २० पक्षीही सुरक्षित होते. मात्र जो पोपट चोरीला गेला त्याची किंमत ५० हजार रुपये  तर अन्य पक्षांची किंमत २५ हजार रुपये इतकी होती.

यादव यांनी व्यावसायिक पक्षी विक्रेत्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप समूहावर पक्षी चोरीला गेल्याचा संदेश पाठविला. दुसऱ्या दिवशी त्यांना संदेश आला की त्यांनी एका काँगो ग्रे पोपट खरेदी केला आहे. त्याने तो ज्या डीलरकडून खरेदी केला त्याच्यामार्फत पोलीस चोरापर्यंत पोहोचले. एका अज्ञात इसमाने ही चोरी केली होती. काँगो ग्रे पोपट हा सिटॅडिटी प्रजातीमधील असून तो माणसासारखा हुबेहूब आवाज काढतो त्यामुळे त्याला खूप मागणी असते.