आसाम, केरळमधील सत्ता गमावल्यानंतर राजकारणात पराभव आणि विजय ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून, पुढील काळातही काँग्रेस लोकांच्या प्रश्नांसाठी लढतच राहील, असे पक्षाचे नेते रणदीप सुर्जेवाला यांनी गुरुवारी सांगितले. पाचही राज्यांतील पराभव काँग्रेसने स्वीकारला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरीमध्ये काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला आहे. यापैकी केरळ आणि आसाममधील पक्षाची सत्ता जाणार हे स्पष्ट झाले आहे. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून सातत्याने काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागते आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रणदीप सुर्जेवाला म्हणाले, राजकारणात पराभव आणि विजय ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. काँग्रेस लोकसेवेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न मांडून अधिक ताकदीने जनतेची सेवा करण्याबद्दल कटिबद्ध आहे. देशातील गरीब, शेतकरी, युवक, मजूर, दलित आणि शोषितांचे प्रतिनिधित्व करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. या पाचही राज्यात विजयी झालेले पक्ष विकासाच्या मार्गाने राज्यांना पुढे घेऊन जातील, अशी आशा आम्ही व्यक्त करतो. या विजयाबद्दल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विजेत्या पक्षांचे अभिनंदन केले आहे, असेही त्यांनी सांगितले.