जन्माने पुणेकर असलेल्या अमेरिकेतील पत्रकार शिरीष दाते यांची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. हफिंगटन पोस्टचे प्रतिनिधी असलेल्या दाते यांनी थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जाहीरपणे प्रश्न विचारला. त्यामुळे ते चर्चेत आले. या घटनेवरूनच काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. दाते यांच्याप्रमाणेच काँग्रेसनंही पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनेक प्रश्न केले आहेत.

“तुम्ही जे खोटं बोलता, तुम्हाला तुमच्या अप्रमाणिकपणाबद्दल पश्चाताप वाटतो का?”, हा प्रश्न शिरीष दाते यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारला आणि ते सगळीकडे चर्चेचा विषय ठरले. दाते यांचा प्रश्न विचारतानाचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतोय. दाते यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे प्रश्न उपस्थित केले आहेत.

“या देशाचे मूळ असलेल्या पत्रकार एस.व्ही. दाते यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारला ‘गेल्या साडेतीन वर्षांत अमेरिकेच्या जनतेशी खोटं बोलल्याबद्दल वाईट वाटतं का?’ आपल्या देशात दातेंसारखे अनेक पत्रकार आहेत. आता हिंमत अधिक लागते हे खरे! पण मोदी जी पत्रकार परिषद घेतील तेव्हा ना!,” सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

“भारतात एन-९५ मास्क, पीपीई किट्स व व्हेंटिलेटर बनवले जात नव्हते, हे असत्य नाही का? आत्मनिर्भर भारत ही स्वातंत्र्यापासून संकल्पना नाही का? गेल्या ५ वर्षांत चीनकडून आयात दुपटीने वाढली नाही का? चीनचे नावही मोदी घेत का नाहीत? Extended neighbor चा अर्थ जवळच्यांचे संबंध बिघडले असे नाही का?,” असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला आहे.

आणखी वाचा- पुणेरी पत्रकाराचा डोनाल्ड ट्रम्पना झटका: विचारला अवघड प्रश्न

मोदी सरकारन जाहीर केलेल्या घोषणांवरूनही सावंत यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. “अगोदरच्या घोषणांचे काय? स्मार्ट सिटी, मेक इन इंडिया, गंगा प्रदूषण मुक्त, स्वच्छ भारत सर्व फेल का झाले? १२५ कोटी लोक एक पाऊल पुढे जाण्याऐवजी १० पावलं मागे का गेले? १४ कोटी बेरोजगार, २५ लाख कोरोनाबाधितांचे काय? स्वप्नरंजन करताना उध्वस्थ वर्तमानाचे काय? अनेक प्रश्न आहेत. उत्तरं नाही,” असा टोला सावंत यांनी मोदी यांना लगावला आहे.

आणखी वाचा- खोटं बोलण्याबद्दल पश्चाताप वाटतो का? ट्रम्प यांना थेट प्रश्न विचारणारे पुणेकर शिरीष दाते कोण आहेत?

शिरीष दाते यांनी नेमका काय प्रश्न विचारला?

“मिस्टर प्रेसिडंट आज तीन-साडेतीन वर्षानंतर, अमेरिकन जनतेशी तुम्ही जे खोटं बोललात, त्याबद्दल तुम्हाला पश्चाताप वाटतो का?,” असा प्रश्न विचारला. पत्रकाराकडून असा प्रश्न आल्यानंतर ट्रम्प थोडे अस्वस्थ झाले. त्यांनी पुन्हा प्रश्न विचारायला सांगितला. त्यावर दाते यांनी पुन्हा तोच प्रश्न केला. त्यावर ट्रम्प यांनी काहीही प्रतिक्रिया न देता दुसऱ्या पत्रकाराच्या प्रश्नाकडे वळले.