काँग्रेसच्या पुस्तिकेमध्ये (बुकलेट) काश्मीरचा नकाशा दाखवताना चुकीचा उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला आहे. नकाशामध्ये काश्मीरचा उल्लेख ‘भारत व्याप्त काश्मीर’ असा करण्यात आला असून या घोडचुकीमुळे काँग्रेसची नाचक्की झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी याप्रकरणात माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे.

उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे शनिवारी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार गुलाम नवी आझाद यांनी एका बुकलेटचे प्रकाशन केले. मोदी सरकारच्या कारभारावर टीका करण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तान आणि चीनसंदर्भात मोदींचे धोरण अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली. मात्र या पत्रकार परिषदेत काँग्रेसने प्रकाशित केलेली बुकलेट वादग्रस्त ठरली. या पुस्तिकेत काश्मीरचा उल्लेख भारतव्याप्त काश्मीर असा करण्यात आला होता. चूक लक्षात येताच काँग्रेसने याप्रकारावर माफी मागत ही छपाई दरम्यानची चूक असल्याचे सांगितले. छपाई दरम्यान ही चूक असून आम्ही यासाठी जनतेची माफी मागतो. पण भाजपच्या संकेतस्थळावरील नकाशावरही अशाच प्रकारचा उल्लेख होता. पण त्यासाठी भाजपने कधी माफी मागितली नाही असे काँग्रेस नेते अजय माकन यांनी सांगितले.

भाजपला मात्र यावरुन काँग्रेसची कोंडी करण्याची संधी मिळाली. काँग्रेसच्या या पुस्तिकेमुळे पाकिस्तानला दिलासा मिळाला असेल असा खोचक टोला भाजपने लगावला आहे. काँग्रेसच्या पुस्तिकेतील चूक फक्त निंदनीय नसून धक्कादायकदेखील आहे. आझाद यांच्यासारखे वरिष्ठ नेते असा चुकीचा नकाशा कसा सादर करु शकतात. ज्यात जम्मू- काश्मीरला भारत व्याप्त काश्मीर असे म्हटले आहे. काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे का असा प्रश्न केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला. संसदेतील प्रस्तावानुसार पाकिस्तान व्याप्त काश्मीर हादेखील भारताचाच भाग आहे. पण भारत व्याप्त काश्मीर असा उल्लेख करुन काँग्रेसने फुटिरतावाद्यांना खूश केले अशी टीका त्यांनी केली आहे.