छत्तीसगडमधील जनता भाजपाच्या विरोधात होती, त्यांना पर्याय हवा होता. त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षाची निवड केली. काँग्रेसला निवडणुकीत आघाडी ही त्यांच्या कामांमुळे नाही तर पर्याय म्हणूनच झाली आहे, असे मत छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री आणि छत्तीसगड जनता काँग्रेसचे प्रमुख अजित जोगी यांनी व्यक्त केले आहे. त्यांचा पक्ष ९ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे पहिल्यांदा राज्यात तिसऱ्या शक्तीचा उदय झाला असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.

जोगी म्हणाले, इथं भाजपा आणि काँग्रेसशिवाय दुसऱ्या पक्षाचा उदय होऊ शकतो असं कोणालाही वाटत नव्हतं. मात्र, छत्तीसगड जनता काँग्रेसने चांगली आघाडी घेतली आहे. काँग्रेसचा विजय इथे दृष्टीपथात असला तरी तो त्यांच्या कामांमुळे नव्हे तर भाजपाला पर्याय म्हणूनच आहे, असे असले तरी छत्तीसगडचा विकास दोन्ही राष्ट्रीय पक्ष करु शकत नाहीत कारण या पक्षांचा मुळ दृष्टीकोन राष्ट्रीय असतो. छत्तीसगड हे सर्व खनिजांनी संपन्न असे राज्य आहे, असे असतानाही ५० टक्के लोक दारिद्ररेषेखाली जीवन जगत आहेत. त्यामुळे त्यांना न्याय हवा आहे.

दरम्यान, आपण प्रचारादरम्यान कधीही काँग्रेस आणि भाजपावर व्यक्तीगत आरोप केले नाहीत. माझी स्वतःची शैली आहे, त्यानुसार मी माझं मत लोकांसमोर मांडतो. काँग्रेसने मला काहीच दिलं नाही असं नाही, त्यामुळे मी काँग्रेसपासून वेगळा झालो असलो तरी कटुता घेऊन बाहेर पडलेलो नाही. भाजपा आणि मोदींचा ग्राफ खाली गेला आहे त्यामुळे २०१९ मध्ये काँग्रेसचा चांगला विजय होऊ शकतो.