28 February 2021

News Flash

हा तर राजकीय वेश्याव्यवसाय- मुख्यमंत्री

पुदुच्चेरीत काँग्रेस सरकार कोसळलं

संग्रहित (PTI)

पुद्दुचेरीत काँग्रेससमोर खूप मोठं राजकीय संकट निर्माण झालं असून सरकार कोसळलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या दौऱ्यानंतर काही दिवसांतच काँग्रेसवर ही वेळ आली आहे. बंडखोर आमदारांमुळे पुद्दुचेरीत काँग्रेसला हातची सत्ता गमवावी लागली असल्याने मुख्यमंत्री नारायणसामी यांनी संताप व्यक्त केला आहे. बहुमत ठराव मांडण्याआधी नारायणसामी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतानापुद्दुचेरीत जे काही सुरु आहे तो राजकीय वेश्याव्यवसाय असल्याची टीका केली होती.

मोठी बातमी! पुद्दुचेरीत काँग्रेसचं सरकार कोसळलं

नारायणसामी सरकारचा ११ विरुद्ध ११ अशा मतांनी पराभव झाला. बहुमत ठराव सादर करण्यासाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. अधिवेशन सुरु होताच नारायणसामी यांनी बहुमतासाठी प्रस्ताव मांडला होता. पण काही वेळातच त्यांच्यासहित सत्ताधारी आमदारांनी सभात्याग केला. यानंतर अध्यक्षांनी काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचं जाहीर केलं.  दरम्यान पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री नारायणसामी यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा सोपवला आहे.

मुख्यमंत्री नारायणसामी यांनी राजीनामा देणाऱ्या आमदारांवर टीका केली असून संधीसाधू म्हणून त्यांचा उल्लेख केला जाईल असं म्हटलं आहे. “आमदारांनी पक्षासोबत निष्ठा राखली पाहिजे. राजीनामा देणारे आमदार आता लोकांना सामोरे जाऊ शकत नाहीत कारण त्यांना संधीसाधू अशी हाक मारली जाईल,” अशी टीका नारायणसामी यांनी केली आहे.

“पुद्दुचेरीत जे काही सुरु आहे तो राजकीय वेश्याव्यवसाय आहे. पण सत्याचाच विजय होईल,” असा विश्वास नारायणसामी यांनी बहुमत सिद्ध करण्याच्या आधी व्यक्त केला होता. नारायणसामी यांनी यावेळी भाजपा जबरदस्ती हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. “तामिळनाडू आणि पुद्दुचेरीत आम्ही दोन भाषांचा वापर करतो, पण भाजपा जबरदस्ती हिंदी लादत आहे,” असं ते म्हणाले आहेत.

“केंद्र सरकारने लोकशाहीची हत्या केली असून पुद्दुचेरीमधील जनता आणि देश त्यांना धडा शिकवेल,” असा विश्वास नारायणसामी यांनी राज्यपाल भेटीनंतर व्यक्त केला आहे.

काँग्रेस आणि द्रमुकच्या प्रत्येकी एक आमदाराच्या राजीनाम्याने ३३ सदस्य असलेल्या विधानसभेत सत्तारुढ काँग्रेस आघाडीचं संख्याबळ ११ पर्यंत घसरलं होतं. विरोधी आघाडीकडे १४ सदस्य, तर सात जागा रिक्त आहेत. यामुळे नारायणस्वामी यांच्या सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती. पण विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्द न करता आल्याने काँग्रेसचं सरकार कोसळलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2021 12:55 pm

Web Title: congress cm narayanasamy puducherry political prostitution sgy 87
Next Stories
1 पुद्दुचेरीही ‘हात’चे गेले… आता ‘या’ पाच राज्यांमध्येच काँग्रेस सत्तेत
2 मोठी बातमी! पुद्दुचेरीत काँग्रेसचं सरकार कोसळलं
3 म्यानमारमध्ये आंदोलनकर्ते आक्रमक, लष्करशाहीला विरोध वाढला; Facebook नेही दिला मोठा दणका
Just Now!
X