संयुक्त राष्ट्र संघाच्या आर्थिक व सामाजिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण व हरयाणात घडलेल्या घडामोडी्ंवरून काँग्रेसनं पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१७ जुलै) संयुक्त राष्ट्र संघाच्या आर्थिक व सामाजिक परिषदेला संबोधित केलं. मोदी यांच्या भाषणावर टीका करताना काँग्रेसनं राजस्थानमधील घडामोडींचा संदर्भ दिला आहे. “मोदी चीन, करोना, आर्थिक संकट विसरले. पण, मानेसरला पोलीस पाठवायला विसरले नाही”, असं काँग्रेसनं म्हटलं आहे.

राजस्थानात मागील काही दिवसांपासून राजकीय कुरघोड्या व घडामोडी घडत आहेत. सचिन पायलट यांनी अशोक गेहलोत यांच्याविरोधात बंडाचं निशाण फडकावल्यानंतर राजस्थानातील काँग्रेस सरकारसमोर अस्थिरतेचं संकट उभं राहिलं आहे. सचिन पायलट आणि समर्थक आमदार हरयाणातील हॉटेलवर थांबले आहेत. राजस्थान पोलीस या हॉटेलवर पोहोचल्यानंतर हरयाणा पोलिसांनी त्यांना रोखलं. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेत केलेल्या भाषणात चीनचा उल्लेख न आल्यानं काँग्रेसनं संताप व्यक्त केला.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याविषयी एक ट्विट करून टीका केली आहे. “मोदीजी, चीनला विसरून गेले. करोना महामारीला विसरून गेले. आर्थिक संकटही विसरून गेले. पण, मानेसरला पोलीस पाठवायला विसरले नाही. हा योगायोग आहे, प्रयोग आहे की सत्तेचा दुरूपयोग,” असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला आहे.

सचिन पायलट व त्यांचे समर्थक १८ आमदार हरयाणातील मानेसर येथील आयटीसी हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. या हॉटेलवर राजस्थान पोलिसांचे एसओजी पथक पोहोचले. मात्र, हरयाणा पोलिसांनी या टीमला या हॉटेलमध्ये प्रवेश करण्यास विरोध केला आहे. ऑडिओ क्लिप प्रकरणात ही टीम आमदारांची चौकशी करण्यासाठी आली असल्याचं वृत्त आहे.