मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन केली. या घोटाळ्यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा सहभाग असल्याचे ठोस पुरावे आम्ही पंतप्रधानांकडे सादर केल्याचा दावा शिष्टमंडळातील सदस्यांनी केला.
दरम्यान, मध्य प्रदेशला अलीकडेच गारपिटीचा तडाखा बसला ती नैसर्गिक आपत्ती जाहीर करावी आणि शेतकऱ्यांना पुरेशी नुकसानभरपाई मिळेल यासाठी पावले उचलावी, अशी विनंतीही काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधानांना केली.
व्यापम घोटाळा आता ‘व्यापक’ झाला आहे, बदुधा हा भारतातील सर्वात मोठा घोटाळा असेल. या वेळी आम्ही मोदी यांच्यासमोर ठोस पुरावा ठेवला आहे. आपण भ्रष्टाचार करणार नाही आणि कोणाला करूही देणार नाही, असे मोदी यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते. त्यामुळे आता मोदी हे प्रकरण स्वत:च हाती घेतील आणि आपला शब्द पाळतील अशी अपेक्षा असल्याचे काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी येथे वार्ताहरांना सांगितले. शिष्टमंडळात दिग्विजयसिंह, कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदे यांचाही समावेश होता.
शिष्टमंडळाने मोदी यांच्याकडे एक सीडी आणि अन्य दस्तऐवज सादर केला असून बेकायदेशीरपणे नियुक्त करण्यात आलेल्या १३१ जणांपैकी ४८ जणांच्या नावापुढे ‘सीएम’ असे लिहिलेले होते, असे सिब्बल म्हणाले.