राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याचा तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा प्रस्ताव सार्वजनिक करण्याची मागणी करून काँग्रेस पक्षाने भाजपला खिंडीत गाठले आहे. साहित्यिक, लेखक, समाजशास्त्रज्ञ, वैज्ञानिक निषेध करून पुरस्कार परत करीत असताना केंद्र सरकार मात्र ‘एकता दौड’ आयोजित करीत आहेत. देशातील असहिष्णू वातावरणाचा सरकारने गांभीर्याने विचारा करावा, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केली. सरदार पटेल यांनी संघावर बंदी घालताना सरसंघचालक मा. स. गोलवळकर व जनसंघाचे नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना धाडलेली पत्रे वाचल्यास हे सरकार उलटय़ा दिशेने पळेल, असा टोला आनंद शर्मा यांनी लगावला. संघ व भाजपकडे स्वत:चे आदर्श नाहीत. त्यामुळे त्यांना काँग्रेसी विचारसरणीच्या सरदार पटेल यांची आठवण आली, असे शर्मा म्हणाले.
सरदार पटेल यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद यांच्यासमवेत स्वातंत्र्य लढय़ात अतुलनीय योगदान दिले. त्यांच्या योगदानाचे सदैव देशाला स्मरण राहील. ते काँग्रेसच्या विचारसरणीचे होते, परंतु भाजपकडे स्वत:चे आदर्श नेते नाहीत. त्यामुळे त्यांनी पटेलांना जवळ केल्याची टीका शर्मा यांनी केली. संघावर गांधी हत्येनंतर बंदी घालण्यात सरदार पटेल यांचाच पुढाकार होता. त्यासंबंधीची कागदपत्रे सरकारने प्रसिद्ध करावीत. शर्मा यांच्या दाव्यानुसार संघाच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी केवळ राजकीय नव्हे तर केवळ सांस्कृतिक क्षेत्रात काम करू, असे लेखी आश्वासन सरदार पटेल यांना दिले होते. देश जोडण्यासाठी सरदार पटेल यांनी कार्य केल्याचा दावा सरकार करीत असेल तर त्यांनी संघावर कुणी बंदी आणली होती, हेदेखील तपासावे, असे ते म्हणाले.
इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनी त्यांची साधी आठवणदेखील न काढणारे अत्यंत छोटय़ा मनोवृत्तीचे असल्याचा घणाघाती हल्ला शर्मा यांनी चढविला. काँग्रेसने केवळ गांधी परिवाराचा उदो-उदो केला या भाजपच्या आक्षेपावर शर्मा म्हणाले की, लालबहादूर शास्त्री, पी. व्ही. नरसिंहराव, डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. त्यामुळे भाजपचा आक्षेप सपशेल चुकीचा आहे.