माजी केंद्रीय दूरसंचारमंत्री ए. राजा हे काँग्रेस आणि द्रमुकचे ‘कालबाह््य टूजी क्षेपणास्त्र’ असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केली. तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्या मातोश्रींचा अपमान करून तमिळनाडूतील महिलांना लक्ष्य केल्याबद्दल मोदी यांनी राजा यांना चांगलेच फटकारले आहे.

काँग्रेस आणि द्रमुकने त्यांचे कालबाह््य टूजी क्षेपणास्त्र डागले आणि तमिळनाडूतील महिला हे या क्षेपणास्त्राचे एक स्पष्ट लक्ष्य होते, असा हल्ला मोदी यांनी राजा यांचा नामोल्लेख न करता चढविला. तमिळनाडूतील नारीशक्तीवर हल्ला करण्याच्या आदेशासह यूपीएने गेल्या काही दिवसांपूर्वी हे क्षेपणास्त्र डागले, असे ते म्हणाले. तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्या मातोश्रींचा आता काँग्रेस आणि द्रमुकने अपमान केला, हे लोक सत्तेवर आल्यास ते तमिळनाडूतील अनेक महिलांचा अपमान करतील, असे पंतप्रधान म्हणाले.

काही दिवसांपूर्वी राजा यांनी प्रचारादरम्यान पलानीस्वामी यांच्या जन्माबद्दल वक्तव्य केले, त्यानंतर सत्तारूढ अभाअद्रमुकने  पोलिसांकडे तक्रार केली आणि त्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला.

काँग्रेस आणि द्रमुकने आपल्या नेत्यांना आवर घालावा, जनता प्रत्येक गोष्टीची नोंद करीत आहे, महिलांचा अपमान कधीही सहन करणार नाही, असेही मोदी म्हणाले.