आपल्यावर आलेले घटनात्मक उत्तरदायित्व न पाळता सहा दशकांच्या राजवटीत काँग्रेसने या देशाला बरबाद केल्याची तोफ गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे एका निवडणूक प्रचारसभेत डागली. गरिबांचे कल्याण साधण्यासाठी तुम्ही कायदे तर करता, परंतु त्यांची अंमलबजावणी मात्र करीत नाही, अशीही टीका मोदी यांनी सोनिया गांधी यांच्यावर केली.
घटनातज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना बनविली ती लोकांना गरीब अथवा आशिक्षित ठेवण्यासाठीच तयार केली काय, असा प्रश्न विचारून काँग्रेसने घटनादत्त उत्तरदायित्व पाळले नाही आणि गेल्या साठ वर्षांत या पक्षाने देशाची बरबादीच केली, असा आरोप मोदी यांनी केला. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी या गरिबांसाठी अनेक कायदे केले असल्याचा दावा करतात. परंतु केवळ कायदे करणे पुरेसे नाही, तर त्यांची अंमलबजावणीही आवश्यक आहे, असे मोदी यांनी ठणकावले. हजारो टन अन्नधान्य रेल्वे स्थानकांवर कुजत ठेवून यूपीए सरकारने सर्वोच्च न्यायालयाचेही ऐकलेले नाही, याकडे लक्ष वेधत हे सरकार गरिबांची खिल्ली उडवीत आहे, अशी टीका मोदी यांनी केली. कुजलेला गहू दारू उत्पादकांना अवघ्या ८० पैसे किलो दराने विकणारे हे सरकार शेतकऱ्यांना मात्र देण्यास तयार नाही, असा आरोप त्यांनी केला.
मोदी यांनी आपल्या भाषणात नद्यांच्या आंतरजोडणी प्रकल्पाच्या मुद्दय़ासही स्पर्श केला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्वप्न असलेल्या या प्रकल्पावर यूपीए सरकारने काम केले असते तर सिकारसारख्या जिल्ह्य़ांमध्ये वाढत्या पाटबंधाऱ्यांच्या साहाय्याने अधिक पिके घेता आली असती, असा दावा मोदी यांनी केला.