मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा या राज्यामधील निवडणुकांचे निकाल भाजपासाठी धक्कादायक असले तरी काँग्रेससाठी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मिळालेले हे यश महत्वाचे ठरणार आहे. केवळ छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये बहुमताचा जादुई आकडा गाठण्यात यश आलेल्या काँग्रेसकडून मध्य प्रदेशमध्येही भाजपाला कडवी झुंज मिळताना दिसत आहे. असे असले तरी पाचही राज्यामध्ये मिळालेल्या मतांची आकडेवारी पाहता काँग्रेसला मोठे यश मिळालेले दिसत आहे. तर दुसरीकडे मतदारांना आकर्षीत करण्यात भाजपा यंदा कमी पडल्याचे चित्र दिसत आहे.

पाचही राज्यांमध्ये झालेल्या एकूण मतदानापैकी चार राज्यांमध्ये काँग्रेसला भाजपापेक्षा अधिक मते मिळाली आहेत. केवळ मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला भाजपापेक्षा कमी मते मिळाली आहेत. मात्र मध्य प्रदेशमधील दोन्ही पक्षांमधील फरक हा अगदीच नगण्य म्हणजेच ०.१ टक्के इतकाच आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपाला ७५ लाख ९० हजार ५७४ मते मिळाली आहेत तर काँग्रेसला ७५ लाख ७१ हजार ८५१ मते मिळाली आहेत. अद्यापही मध्य प्रदेशमध्ये कोण सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झाले नसले तरी जागांच्या आकड्यांमध्ये असणारी चुसर ही मतांच्या आकडेवारीतही असल्याचे दिसून येत आहे.

या निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश खालोखाल दुसरे महत्वाचे राज्य असणाऱ्या राजस्थानमध्येही भाजपाला पराभवाला समोरे जावे लागले आहे. मात्र येथे जागांमधील फरक अधिक असला तरी अगदी थोड्या फरकाने काँग्रेसला मिळालेली मते ही भाजपाला मिळालेल्या मतांपेक्षा जास्त आहेत. १ कोटी ९ लाख ९६ हजार ६६७ मते काँग्रेसच्या पारड्यात पडली आहेत तर भाजपाच्या जागा कमी असल्या तरी १ कोटी ८ लाख ४८ हजार ४१७ मतदारांनी त्यांना आपले मत दिले आहे. ही आकडेवारी राजस्थानमध्ये झालेल्या एकूण टक्केवारीच्या स्वरुपात सांगायची झाली तर काँग्रेसला ३९.१ टक्के मते मिळाली असून भाजपाला ३८.६ टक्के मते मिळाली आहेत.

छत्तीसगडमध्ये भाजपाच्या दृष्टीने अगदीच अनपेक्षित निकाल लागला आहे. एक्झिट पोलने वर्तवलेल्या सर्व शक्यता नाकारत थेट काँग्रेसने राज्यात मुसंडी मारली आहे. एकूण मतांपैकी ४२.९ टक्के मते काँग्रेसला तर ३२.७ टक्के मते भाजपाला मिळाली आहेत. काँग्रेसच्या मतांचा आकडा २१ लाख ७८ हजार ४२९ आहे तर भाजपाला मिळालेल्या मतांचा एकूण आकडा १६ लाख ६१ हजार ५०२ आहे.

देशातील सर्वात नवीन राज्य असणाऱ्या तेलंगणामध्ये टीआरएस आणि एमआयएम युतीने बहुमताचा आकडा पार करत एकूण मतांच्या ४९.९ टक्के (एकत्रितरित्या) मते मिळवली आहेत. असे असले तरी येथेही काँग्रेस मतांच्या संख्येत दुसऱ्या स्थानावर असून एकूण मतदानाच्या २८.७ टक्के म्हणजेच ४६ लाख ८१ हजार ३४६ मते मिळवली आहेत. येथे काँग्रेस आणि भाजपाला मिळालेल्या मतांमधील फरक हा २१.८ टक्के ३६ लाख १० हजार ५६९ इतका आहे. भाजपाला राज्यात ६.९ टक्के म्हणजे ११ लाख ३३ हजार ९९९ मते मिळाली आहेत.

मिझोरमममध्ये मिझोरम नॅशनल फ्रण्टला स्पष्ट बहुमत मिळाले असून त्यांना एकूण मतांपैकी ३७.६ टक्के (२ लाख ३६ हजार ७२२) मते मिळाली आहेत. त्या खालोखाल राज्यात काँग्रेसला ३० टक्के (१ लाख ९० हजार १००) मते मिळाली असून भाजपाला मिझोरममध्ये केवळ ८.१ टक्के म्हणजेच ५० हजार ७३१ मते मिळाली आहेत.

एकंदरित ही आकडेवारी पाहता आगामी निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला मतदारराजाला गृहित धरुन चालणार नाही असेच चित्र दिसत आहे.