पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर टीका करत शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने सरकार असलेल्या काही राज्यांमध्ये कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हाती लॉलीपॉप दिल्याची टीका केली आहे. कर्नाटकमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. कर्नाटकात जेडीएस-काँग्रेसचे सरकार सत्तेत आलं आहे. उत्तर प्रदेशमधील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील शेतकऱ्यांचं थोडंसंच कर्ज माफ करण्यात आल्याचा आरोप केला.

यावेळी नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली होती. त्यांनी काँग्रेस पक्ष म्हणजे लॉलीपॉपची फॅक्टरी असल्याचा टोला लगावला. ‘मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ताबदल होऊन काँग्रेस सत्तेवर आली असून शेतकऱ्यांना आत्तापासूनच त्याचे चटके सहन करावे लागत आहेत. युरियाच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या रांगेत उभं राहावं लागत आहे’, असं मोदींनी म्हटलं.

पुढे त्यांनी सांगितलं की, ‘कर्नाटकात काँग्रेस बॅकस्टेजवरुन आलं आणि सत्ता स्थापन केली. त्यांनी आश्वासनांच्या नावाखाली लॉलीपॉप दिले. त्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं, पण फक्त 800 लोकांचंच कर्ज माफ झालं. तुम्ही अशा लॉलीपॉप कंपन्यांवर विश्वास कसा काय ठेवू शकता ?’. यावेळी त्यांनी लोकांना काँग्रेसच्या खोट्या आश्वासनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.

‘शेतकऱ्यांना त्यांचं सहा लाख कोटींचं कर्ज मफा केलं जाईल असं आश्वासन देण्यात आलं होतं. पण फक्त 60 हजार कोटींचं कर्ज माफ करण्यात आलं. इतकंच नाही तर जेव्हा कॅग रिपोर्ट आला तेव्हा त्यातील 35 लाख रुपये त्या लोकांना मिळाले जे ना शेतकरी होते, ना त्यांना कर्जमाफीची गरज होती’, असा आरोप मोदींनी केला.