माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या पाठोपाठ आता कर्नाटकातील काँग्रेस नेते डी.के.शिवकुमार यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी होणार आहे. शिवकुमार यांची कर्नाटकातील काँग्रेसचे संकटमोचक अशी ओळख आहे. परंतु आता त्यांच्यावरच ईडीच्या चौकशीचे संकट ओढावले आहे. गुरूवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने शिवकुमार यांची याचिका फेटाळली होती. या याचिकेत त्यांनी ईडीचे समन्स रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. परंतु न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली असून आता त्यांना ईडीसमोर चौकशीसाठी जावे लागणार आहे. दरम्यान, आज (शुक्रवारी) ते ईडीसमोर हजर राहण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच कथित आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीदेखील ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता शिवकुमार यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. यापूर्वी आयकर विभागाने शिवकुमार यांच्या दिल्लीतील काही ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यामध्ये आठ कोटींपेक्षा अधिक रक्कम जप्त करण्यात आली होती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ईडीने डी.के.शिवकुमार आणि त्यांच्या तीन सहकाऱ्याविरोधात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली खटला दाखल करण्यात आला होता.

ईडीने नोव्हेंबर 2018 मध्ये शिवकुमार यांना नोटीस बजावली होती. परंतु शिवकुमार यांनी चौकशीसाठी हजर न राहण्याची सुट मागितली होती. परंतु त्यांना ईडीकडून दिलासा मिळाला नव्हता. त्यानंतर त्यांनी याविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात या विरोधात याचिका दाखल केली होती. परंतु गुरूवारी त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली असून आता त्यांना ईडीपुढे चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.