जगभरात तसंच देशात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत करोनावरील लस विकसित करण्यावर दिवसरात्र काम सुरू आहे. भारतातही करोनावरील लसीवर संशोधन सुरू आहे. दरम्यान करोना विषाणूवरील लसीसंदर्भात काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे. करोना विषाणूची लस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी एक रणनिती आखण्याची गरज असल्याचं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं.

“भारत करोनावरील लस विकसित करणाऱ्या देशांमध्ये सहभागी होईल. देशाला एक स्पष्ट आणि सर्वांना सामावून घेणारी रणनिती आखायला हवी. जेणेकरून ही लस सर्वांसाठी उपलब्ध होईल आणि सर्वांना ही लस सहजरित्या घेता येईल. केंद्र सरकारनं हे आताच करायला हवं,” असं राहुल गांधी म्हणाले. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

आणखी वाचा- करोना संकट : २४ तासांमध्ये देशात १००७ जणांचा मृत्यू आणि ६४,५५३ नवे रुग्ण

यापूर्वी गुरूवारी त्यांनी करोनावरील एक आलेख शेअर करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. “जर ही पंतप्रधानांची नियंत्रणातील स्थिती आहे तर नियंत्रणाबाहेरील स्थिती कशी असेल?,” असा सवाल त्यांनी केला होता. गेल्या महिन्यात ‘नोवेल आयडियाज इन सायन्स अँड एथिक्स ऑफ वॅक्सिन अगेन्स्ट कोविड १९’ या विषयावर एका आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देताना जर करोनावरील लस तयार झाली तर ती सर्वात प्रथम कोणाला देण्यात येईल यावर चर्चा सुरू असल्याचं म्हटलं होतं. “करोनाची लस सर्वात प्रथम कोणाला देण्यात यावी याविषयावर सरकारमध्ये आणि सरकार बाहेरही चर्चा सुरू आहे,” अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे विशेष अधिकारी राजेश भूषण यांनी सांगितलं होतं.