अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी एक टि्वट केले आहे. माझ्या वडिलांनी भारत-अमेरिका संबंध बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना आज यश मिळत आहे. त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. पण या दौऱ्याच्या राजनैतिक कार्यक्रमांमधून काँग्रेस अध्यक्ष आणि देशातील मुख्य विरोधी पक्षाच्या नेत्याला वगळल्याबद्दल मिलिंद देवरा यांनी नाराजी प्रगट केली आहे.

मुक्त जगातील नेते जेव्हा भेटतात, तेव्हा लोकशाही परंपरांचा आपण आदर केलाच पाहिजे असे मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे. मिलिंद देवरा यांचे वडिल मुरली देवरा हे काँग्रेसचे मुंबईतील मोठे नेते होते. त्यांनी भारत-अमेरिका संबंध सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले. २०१४ मध्ये त्यांचे निधन झाले.

मिलिंद देवरा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन आज राजकारणात सक्रीय आहेत. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी त्यांचा दोन्ही वेळ पराभव केला.