काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज स्थलांतरित मजुरांच्या व्यथा जाणून घेतल्या. सुखदेव विहार या ठिकाणाहून जे मजूर पायी चालत होते त्यांच्याशी आज राहुल गांधी यांनी चर्चा केली. हे सगळे मजूर आपल्या घरी पायी चालले होते. राहुल गांधी यांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी वाहनांची व्यवस्था केली. हे मजूर हरयाणाहून झाँसी या ठिकाणी पायी निघाले होते. “राहुल गांधी यांनी आमची विचारपूस केली. आम्हाला ते चालत असताना भेटले. त्यांनी आम्हाला अन्न, पाणी, मास्कही दिले” असं देवेंद्र नावाच्या मजुराने एएनआयला सांगितलं आहे.

दरम्यान पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या स्थलांतरित मजुरांची राहुल गांधी यांनी भेट घेतली होती त्यांच्यापैकी काहींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कारण नियमाप्रमाणे एका वाहनातून गर्दी करुन जाणं हे मान्य नाही. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ज्या वाहनांची व्यवस्था या मजुरांसाठी केली होती त्यात गर्दी झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान पोलिसांनी काही मजुरांना ताब्यात घेतल्याचं आम्हाला समजलं तेव्हा आम्ही पोलिसांशी बोललो आणि एका वाहनातून फक्त दोघांनाच पाठवतो असं त्यांना सांगितलं. त्यानुसार आमचे काही कार्यकर्ते हे आत्ताही पोलिसांशी संवाद साधत आहेत अशी माहिती अनिल चौधरी यांनी एएनआयशी बोलताना दिली.