२०१९च्या लोकसभा निवडणुकीत अमेठी या काँग्रेसच्या परंपरागत मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना केरळमधल्या वायनाडने साथ दिली होती. वायनाडमधून राहुल गांधी मोठ्या मताधिक्याने जिंकून आले होते. अमेठीप्रमाणेच वायनाड देखील काँग्रेससाठी सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. मात्र, आता त्याच वायनाडमध्ये राहुल गांधींना मोठा झटका बसला आहे. वायनाड जिल्ह्यातल्या ४ प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे या नेत्यांनी काँग्रेसविरोधी माकपमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भावी पक्षाध्यक्ष आणि काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार मानले जाणारे राहुल गांधी यांना त्यांच्याच मतदारसंघात मोठा फटका बसल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे.

६ एप्रिलला मतदान, तर २ मेला निकाल!

केरळमध्ये ६ एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. एकाच टप्प्यात होणाऱ्या या मतदानाची मतमोजणी मात्र थेट २ मे रोजी होणार आहे. कारण केरळसोबत पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी या चार ठिकाणी देखील निवडणुका होत असून सर्वात जास्त काळ म्हणजेत ८ टप्प्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यासाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणार असून त्यामुळेच केरळला देखील मतमोजणी आणि निकालासाठी मतदानानंतर जवळपास ४ आठवडे वाट पाहावी लागणार आहे. केरळ विधानसभा निवडणुकांच्या आधीच राहुल गांधींच्याच मतदारसंघात काँग्रेस नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देणं हा काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो.

काँग्रेस सोडलेल्या नेत्यांमध्ये केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव एम. एस. विश्वनाथन, महिला काँग्रेस राज्य सचिव सुजया वेणुगोपाल, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसचे सरचिटणीस पी. के. अनिल कुमार आणि केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे सजस्य के. के. विश्वनाथन यांचा समावेश आहे.

काँग्रेसमध्येही इनकमिंग!

दरम्यान, एकीकडे काँग्रेसमधून आऊटगोइंग झालेलं असताना दुसरीकडे इनकमिंग देखील पाहायला मिळालं आहे. माकपचे नेते इ. ए. शंकरन यांनी बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या भागात काँग्रेसची ताकद वाढल्याचं म्हटलं जात आहे. आदिवासी क्षेमा समितीचे ते राज्य सचिव असल्यामुळे मोठी व्होटबँक काँग्रेसच्या पाठिशी उभी राहू शकते.

केरळ – ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन असणार भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार