कर्नाटकमध्ये काँग्रेस- जनता दल (सेक्युलर) (जेडीएस) सत्ताधारी आघाडीतील बंडखोर आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर अनेक दिवस लांबलेल्या शक्तिपरीक्षेत मंगळवारी एच. डी. कुमारस्वामी सरकारचा पराभव झाला. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने ९९, तर विरोधात १०५ मते पडल्याने कुमारस्वामी सरकार कोसळले असून, भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. यामुळे काँग्रेसच्या हातून आणखीन एक राज्य गेलं असून आता काँग्रेसची सत्ता देशातील चार राज्य आणि एका केंद्रसाशित प्रदेशापुरती मर्यादित राहिली आहे.

काँग्रेसच्या हातून कर्नाटकही गेल्यानंतर आता काँग्रेसची सत्ता केवळ पंजाब, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राज्यस्थान या राज्यांमध्ये राहिली आहे. त्याचबरोबर केंद्रसाशित प्रदेश असणाऱ्या पॉण्डचेरीमध्येही काँग्रेसचीच सत्ता आहे. कर्नाटकमध्ये विश्वासदर्शक ठराव असल्याने पॉण्डचेरी वगळता दक्षिण भारतातून काँग्रेस हद्दपार झाली आहे.

मागील वर्षी कर्नाटकमध्ये जेडीएस सोबत काँग्रेसने कर्नाटकमध्ये आघाडी सरकार स्थापन केले होते. काँग्रेसने कर्नाटकमध्ये सत्तेमध्ये राहण्यासाठी जेडीएसला मदत करत सत्ता स्थापन केली. त्यानंतर काही महिन्यांमध्ये झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींमध्ये काँग्रेसने तीन राज्यांमध्ये बाजी मारली. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन महत्वाच्या हिंदी भाषिक राज्यांमध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली. लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला हे यश मिळाल्याने लोकसभेतही पक्ष चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. काँग्रेसला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केवळ ५२ जागा जिंकता आल्या. तर दुसरीकडे भाजपा आणि मित्र पक्षांनी या निवडणुकीमध्ये ३५० जागांवर विजय मिळवला.

लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांमध्ये कर्नाटकमध्येही काँग्रेसला सत्तेतून बाहेर पडावे लागत असल्याने हा काँग्रससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

देशभरात भाजपाविरोधात करणार आंदोलन

काँग्रेसने कर्नाटकमधील सत्ता गेल्यानंतर देशभरामध्ये भाजपाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे कर्नाटकमधील हंगामी महासचिव के. सी वेणुगोपाल यांनी विधानसभेतील विश्वासदर्शक ठराव हरल्यानंतर ही घोषणा केली आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी या पराभवाची जबाबदारी घेत अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र अद्यापही काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल कोणतेही चित्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.