कर्नाटकत सुरू अलेल्या राजकीय घडामोडींमध्ये आता अधिकच भर पडत आहे. अगोदर काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांनी बंडखोरी करत मुंबई गाठलेली असताना आता काँग्रेसच्या आणखी दोन आमदारांनी राजीनामे दिले आहेत. के सुधाकर आणि एमटीबी नागराज या आमदारांनी काँग्रसकडे राजीनामे सोपवल्यानंतर हे दोघेही राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनात दाखल झाले आहेत.

तर आज सकाळी मुंबईतील काँग्रेस आमदारांची मनधरणी करण्यासाठी आलेल्या डीके शिवकुमार यांच्यासह मिलिंद देवरा व अन्य काँग्रेस नेत्यांना मुंबई पोलिसांनी आमदारांची भेट घेऊ न देता ताब्यात घेतले आहे. याबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी भाजपासह महाराष्ट्र सरकारवर टीका करत म्हटले की, मुंबईत कर्नाटक सरकारचे मंत्री व आमदारांबरोबर पोलिसांनी केलेली धरपकड चुकीची आहे. महाराष्ट्र सरकारचे हे पाऊल या शंकेला अधिक वाव देते की भाजपा घोडेबाजारास प्रोत्साहन देत आहे. हा देशाच्या लोकाशाही व्यवस्थेवर काळा डाग आहे.

या अगोदर विधानसभा सभापती केआर रमेश कुमार यांनी म्हटले आहे की, मी कोणाचाही राजीनामा स्वीकरलेला नाही. मी अचानक असे काही करू शकत नाही. मी त्यांना १७ जुलै पर्यंतची मुदत दिली आहे. मी नियमानुसार कार्यवाही करत निर्णय घेईल.

यामुळे कर्नाटकच्या बंडखोर आमदारांनी विधानसभा सभापतींविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.