देश सध्या करोना नावाच्या संकटाशी लढा देतो आहे. कोट्यवधी बांधव आहेत ज्यांच्यासमोर आर्थिक आणीबाणी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत किंमती कमी करण्याऐवजी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर उत्पादन शुल्क वाढवले आहे. पेट्रोलवर प्रति लिटर १० आणि डिझेलवर १३ रुपये अशा रितीने हे उत्पादन शुल्क वाढवण्यात आलं आहे.  मोदी सरकारचा हा निर्णय म्हणजे एक चुकीचं पाऊल आहे. हा निर्णय मागे घेतला पाहिजे अशी मागणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटसोबत एक व्यंगचित्रही पोस्ट केले आहे. यामध्ये सामान्य माणूस पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे घाबरुन हात वर करुन उभा आहे असं दिसतं आहे. पेट्रोल मशीनला लावलेला पाईप हा एखाद्या बंदुकीप्रमाणे त्याच्यावर रोखून धरलेलाही या व्यंगचित्रात दिसतो आहे.

आणखी वाचा- Lockdown 3 नंतर काय करणार मोदी सरकार?- सोनिया गांधी

केंद्र सरकारनं पेट्रोल व डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलवर प्रति लिटर १० रुपये, तर डिझेलवर प्रति लिटर १३ रुपये उत्पादन शुल्क आकारले जाणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा भार तेल कंपन्यांवर पडणार आहे. त्यामुळे थेट सामान्य नागरिकांच्या खिशाला याची झळ सोसावी लागणार नाही. केंद्र सरकारनं घेतलेला हा निर्णय ६ मे पासून लागू करण्यात आला आहे. मात्र या निर्णयावर राहुल गांधी यांनी टीका केली असून मोदी सरकारने हा निर्णय मागे घ्यावा असंही म्हटलं आहे.