देशाच्या पंतप्रधानांना अभिनंदनला सोडवण्यापेक्षा पक्षाचे हित जास्त महत्वाचे वाटते आहे म्हणून ते देशातील भाजपाच्या १५ हजार बुथवर अध्यक्षांशी आज संवाद साधत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला आहे. भारताने पाकिस्तानचे एफ 16 लढाऊ विमान पाडले मात्र त्यावेळी आपले मिग २१ विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या सुटकेसाठी भारताकडून सर्वोपतरी प्रयत्न सुरु आहे.

आपला जवान अभिनंदन पाकिस्तानमधून परत येण्याची जास्त गरज आहे. त्यासाठी देश आणि पंतप्रधानांनी प्रयत्न केला पाहिजे परंतु देशाचे पंतप्रधान भाजपच्या बुथ कमिटीच्या भारतातील अध्यक्षांचा मेळावा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेणार आहेत. पुलवामाचा हल्ला झाला त्यावेळीसुद्धा नरेंद्र मोदी त्यांच्या पक्षाच्या सभा घेत फिरत होते असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान आज त्या जवानाला सर्वतोपरीने प्रयत्न करुन सोडवण्याची गरज आहे अशी स्पष्ट भूमिका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडली.

काँग्रेस नेते शशी थरुर यांनीही टीका केली असून परिपक्व नेतृत्वाची गरज असून नाटकी राजकारणाची गरज नसल्याचं म्हटलं आहे.

भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यांना सहीसलामत भारतात आण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नात असून हाच मुद्दा त्यांच्या अजेंड्यावर आहे. अभिनंदन यांना कोणतीही इजा झाली नाही पाहिजे, अशा सक्त शब्दांत केंद्राने इस्लामाबादला सांगितले असून पाकिस्तानी लष्करानेही त्यांच्याशी योग्य वर्तणूक करण्याची हमी दिल्याचे सांगितले जाते.