एकीकडे महाराष्ट्र व हरियाणा या दोन प्रमुख राज्यांमध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना, दुसरीकडे काँग्रेसवर आपल्याच नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या विविध वक्तव्यांचा सामना करण्याची वेळ आल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी, राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर पक्षावरील संकट आणखी वाढलं असून आमचे नेते सोडून गेले हीच पक्षासमोरील मोठी समस्या असल्याचे म्हटल्यानंतर आता काँग्रेसचे दुसरे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी देखील काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज असल्याचे म्हणत घरचा आहेर दिला आहे.

मला कोणाच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया द्यायची नाही, मात्र काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज आहे, यात कुठलीच शंका नाही. असे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटले आहे. तर, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेल्या अपयशानंतर ज्योतिरादित्य सिंधिया पक्षातील अंतर्गत मुद्यांवरून नाराज असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. शिवाय, राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी देखील सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता.

या अगोदर सलमान खुर्शीद यांनी २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यातूनच पक्ष अद्याप बाहेर पडला नसल्यानं पक्षाला संकटांचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले होते. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मत व्यक्त केलं होतं.

“लोकसभा निवडणुकीत आम्हाला पराभवाचा सामना का करावा लागला याचं एकत्रित विश्लेषणही आम्ही करू शकलो नाही. पक्षातील ज्येष्ठ नेते पक्षापासून दूर गेले हे आमच्यासमोरील मोठं संकट आहे. राहुल गांधी यांच्यावर आताही पक्षाचा विश्वास आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, “सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली असली तरी त्या नव्या अध्यक्षाच्या प्रतिक्षेत असल्याचं खुर्शीद यांनी सांगितलं आहे.