आधीच संथगतीने वाटचाल करणाऱ्या अर्थव्यवस्थेला करोनाचा मोठा फटका बसला. भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीचा दर सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत शून्याखाली घसरून २३.९ टक्क्यांनी आक्रसल्याचं सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनं स्पष्ट केलं. तिमाहीगणिक आकडेवारी प्रसिद्ध करण्याच्या १९९६ पासून सुरू झालेल्या प्रघातापासून, नकारात्मक आर्थिक विकासाची ही सर्वात भयाण आकडेवारी असून एकूणच आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थांमधील सर्वात वाईट कामगिरीही असल्याचं समोर आलं आहे. आता यावरून अनेक स्तरांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, यावरून काँग्रेसनंही अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे.

“देशावासीयांनी अनेक दशकांपासून उभ्या केलेल्या अर्थव्यवस्थेचा भाजपानं अनर्थ करून टाकला आहे,” असं म्हणत काँग्रेसनं भाजपावर टीकेचा बाण सोडला आहे. “करोना माहामारीच्या आधीपासूनच आपल्या अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करण्यास कोणतीही संधी सोडली नाही. असंघटीत क्षेत्रालाही जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आलं. संघटीत क्षेत्रावर नियंत्रण असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निकटवर्तीयांना त्याचा लाभ मिळावा यासाठी हे करण्यात आलं,” असा आरोप काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी केला.

आणखी वाचा- राहुल गांधींनी मोदी सरकारला दिलेला इशारा पाच महिन्यातच ठरला खरा

कृषी क्षेत्रात सकारात्मक वाढ

अपेक्षा केली जात होती त्याप्रमाणे, केवळ कृषी क्षेत्रात एप्रिल-जून तिमाहीत सकारात्मक वाढ राहिली, असे राष्ट्रीय सांख्यिकी विभागाची (एनएसओ) आकडेवारी दर्शविते. मात्र अर्थव्यवस्थेच्या उत्पादन, बांधकाम आणि सेवा क्षेत्र या इतर अंगांमध्ये कमालीचा उतार दिसला आहे. करोना प्रतिबंध म्हणून २५ मार्च २०२० पासून सुरू झालेल्या देशव्यापी टाळेबंदीने व्यापार-उदिमासह, सामान्य जनजीवनावर साधलेल्या विपरीत परिणामाचेच प्रतिबिंब अर्थव्यवस्थेतील या भीषण उतारात प्रतिबिंबित झाले आहे, अशी ‘एनएसओ’ची स्पष्टोक्ती आहे.

आणखी वाचा- मोदी सरकार म्हणजे ‘रामराज्य’, विरोधक नकारात्मक विचारसरणीचे; योगींचा टोला

देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन (२०११-१२ च्या स्थिर किमतीनुसार) २०२०-२१ आर्थिक वर्षांच्या प्रथम तिमाहीत २६.९० लाख कोटी रुपये अंदाजण्यात आले आहे, जे २०१९-२० च्या प्रथम तिमाहीत ३५.३५ लाख कोटी रुपये होते. म्हणजे २०१९-२० च्या पहिल्या तिमाहीत दिसलेल्या ५.२ टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत ते २३.९ टक्क्यांनी आकुंचन पावले आहे, असे ‘एनएसओ’ने दिलेल्या निवेदनातून स्पष्ट केले आहे.

करोनापूर्वीही घट

करोनाच्या प्रादुर्भावापूर्वीही म्हणजे जानेवारी ते मार्च २०२० तिमाहीत अर्थव्यवस्थावाढीचा दर हा आठ वर्षांच्या नीचांकाला म्हणजे ३.१ टक्के नोंदविला गेला होता, तर मागील वर्षांत एप्रिल ते जून २०१९ तिमाहीत जीडीपीवाढीचा दर ५.२ टक्के असा होता.