राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडीचं (यूपीए)अध्यक्षपद सोपवण्यासंबंधी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशात विरोधी पक्ष खिळखिळा असून युपीए मजबूत करण्याची गरज आहे. यासाठी शरद पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवावं अशी भूमिका मांडली आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेची मागणी महाविकास आघाडी सरकारच्या मुळावर येऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांची युपीए अध्यक्ष होण्याची इच्छा असेल असं मला वाटत नाही असं पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे. “हे काही पंतप्रधानपद नाही आणि स्वत: शरद पवार यांची युपीए अध्यक्ष म्हणून जाहीर केलं जावं अशी इच्छा नसावी,” असं पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

दिल्ली दौऱ्याआधी UPA अध्यक्षपदाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

“शरद पवार यांचीही युपीए अध्यक्ष म्हणून आपल्या नावाची घोषणा किंवा निवड व्हावी अशी इच्छा नसेल. जेव्हा बैठक होईल तेव्हा योग्य व्यक्तीची निवड केली जाईल. आम्ही पंतप्रधानांची निवड नाही करत आहोत,” असं पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे. युपीए अध्यक्ष अशी काही गोष्टच नाही असंही ते म्हणाले आहेत.

पी चिदंबरम यांनी यावेळी युपीएमधील पक्षांच्या बैठकीचं महत्व सांगितलं. जर मित्रपक्षांची बैठक बोलावली तर काँग्रेस अध्यक्ष त्याचं नेतृत्व करणार हे नैसर्गिक आहे असं ते म्हणाले आहेत. “युपीएची बैठक घेण्यासाठी काही पक्ष पुढाकार घेऊ शकतात आणि काँग्रेस त्यात सहभागी होईल. पण जर काँग्रेसने बैठक बोलावली असेल तर काँग्रेसचाच नेता बैठकीचं नेतृत्व करेल,” असं पी चिदंबरम यांनी सांगितलं आहे.

शरद पवारांनीही फेटाळलं वृत्त –
दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार दिल्लीला जाणार आहेत. यावेळी ते विरोधी नेत्यांची भेट घेतील. दरम्यान शरद पवार यांनी दिल्ली दौऱ्याआधी न्यूज १८ शी बोलताना युपीए अध्यक्षपदासंबंधी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार यांनी युपीए अध्यक्षपदी विराजनमान होण्याचं वृत्त फेटाळलं आहे. “माझ्याकडे युपीए अध्यक्ष होण्यासाठी वेळ किंवा तसा विचार नाही. अशा प्रकारच्या कोणत्याही प्रस्तावाचा प्रश्नच येत नाही,” असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.

शरद पवार यांनी याआधीदेखील युपीए अध्यक्ष होण्याचं वृत्त फेटाळलं होतं. प्रसारमाध्यमांशी बोलताना शऱद पवार यांनी हे वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं बोकं. “ही बातमी तुम्ही दिली आहे, अशा खोट्या बातम्या देऊ नका,” असं शरद पवार यांनी प्रसारमाध्यांना उद्देशून म्हटलं होतं.

संजय राऊत यांनी काय म्हटलं आहे-
“देशात विरोधी पक्ष खिळखिळा असून संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए )मजबूत करण्याची गरज आहे. यासाठी शरद पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवावं,” अशी भूमिका शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मांडली. “शरद पवार यांच्याकडे यूपीएचे नेतृत्व सोपविल्यास शिवसेनेसह रालोआतून (एनडीए) बाहेर पडलेल्या पक्षांसह देशभरातील भाजपविरोधातील पक्षही यूपीएमध्ये सहभागी होण्याचा विचार करतील,” असं प्रतिपादन राऊत यांनी केले.

निरुपम यांचे प्रत्युत्तर
“काँग्रेस पक्षाला दुगणे देत शरद पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवावे ही शिवसेनेची मागणी महाविकास आघाडी सरकारच्या मुळावर येऊ शकते. कारण शिवसेनेने सातत्याने काँग्रेसवर टीकाटिप्पणी केल्यास काँग्रेस नेतृत्वाकडून पाठिंब्याबाबत फेरविचार होऊ शकतो. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्वाबाबत शिवसेनेला चिंता असली तरी शिवसेना या आघाडीत आहेच कुठे?,” असा सवाल काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केला.