मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा ठाकूर व इतर पाचजणांविरुद्धचे आरोप रद्द करण्याच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) निर्णयावरून काँग्रेसने मोदी सरकारवर शुक्रवारी जोरदार हल्ला चढवला. दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या रा. स्व. संघाच्या लोकांना वाचवण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.
सरकारने काँग्रेसचा हा आरोप ताबडतोब फेटाळून लावला. सरकार यंत्रणांच्या तपासात हस्तक्षेप करत नाही, असे गृहमंत्री किरण रिजिजू म्हणाले, तर प्रज्ञा ठाकूर यांना यूपीए सरकारने या प्रकरणात ‘गोवले’ होते असा आरोप भाजपने केला.
पोलीस तसेच एनआयएच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या संघ परिवाराच्या लोकांना वाचवण्याचा पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री व केंद्रीय मंत्रिमंडळ प्रयत्न करत असल्याचा माझा आरोप आहे, असे दिग्विजय सिंग म्हणाले.
सरकार एनआयएवर प्रभाव टाकत असल्याचा काँग्रेसचा आरोप निराधार आहे. एनआयए त्यांचे काम स्वतंत्रपणे करत आहे, असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले.
२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना ‘गोवण्यात’ आले होते असे सांगून त्यांच्यासह पाच जणांविरुद्धचे आरोप रद्द करण्याच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) निर्णयाचे भाजपने स्वागत केले आहे.
.प्रज्ञा ठाकूर व इतरांना या प्रकरणांमध्ये निव्वळ गोवण्यात आले असल्याचे माझे पहिल्या दिवसापासून मत होते. साध्वी प्रज्ञासारख्या व्यक्तीने सहन केलेले अत्याचार पाहता, एखादा कायद्याचे पालन करणारा देश असता तर यात गुंतलेल्या लोकांविरुद्ध उलट तपास करण्यात आला असता, असे भाजपच्या प्रवक्त्या मीनाक्षी लेखी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.