काँग्रेस मुसलमानांचा पक्ष आहे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हवाल्याने एका उर्दू वृत्तपत्राने वृत्त दिले होते. त्यानंतर देशभरात राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. भाजपाने संधी हेरत काँग्रेसवर निशाणा साधला होता. काँग्रेसने यापूर्वीच हे वृत्त फेटाळले होते. या संपूर्ण प्रकरणावर भाष्य न केलेल्या राहुल गांधी यांनी आज ट्विट करत मौन सोडल्याचे दिसते. मी रांगेतल्या सर्वांत शेवटी उभ्या असलेल्या व्यक्तीबरोबर आहे. शोषित आणि त्रस्त लोकांबरोबर मी आहे. त्यांचा धर्म, त्यांची जात, आस्था माझ्यासाठी महत्वाची नाही. मला सर्वजण प्रिय आहेत, होय मी काँग्रेस आहे.. अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी भाजपाला सडेतोड उत्तर दिल्याचे मानले जाते.

मी रांगेतल्या सर्वांत शेवटच्या व्यक्तीबरोबर आहे. शोषित, त्रस्त लोकांबरोबर आहे. त्यांचा धर्म, त्यांची जात, आस्था माझ्यासाठी महत्वाची नाही. ज्यांना त्रास होतो, मी त्यांना अलिंगण देऊ इच्छितो. मी तिरस्कार आणि भय नष्ट करू इच्छितो. मला सर्वजण प्रिय आहेत. मी काँग्रेस आहे.., असे राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी मुस्लीम विचारवंतांबरोबरील मुलाखती काँग्रेस मुसलमानांबरोबर असल्याचे म्हटले होते, असे वृत्त गेल्या आठवड्यात ‘इन्कलाब’ या उर्दू वृत्तपत्राने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर भाजपाने काँग्रेसवर टीका करत त्यांना जातीयवादी पक्ष असल्याची टीका केली होती. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी काँग्रेसवर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशाला जातीच्या आधारावर फूट पाडण्याचा आरोप केला होता. काँग्रेस फक्त मुस्लीम पुरूषांबरोबर आहे की मुस्लीम महिलांबरोबर आहे, हे स्पष्ट करावे असे त्यांनी म्हटले होते. याला उत्तर देताना काँग्रेसने हे वृत्त चुकीचे असून भाजपा खोटे वृत्त पसरवत असल्याचा आरोप केला होता.