राहुल गांधी यांच्याकडे जेव्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोपविण्याचा निर्णय घेतला जाईल, तेव्हा तुम्हाला आपोआप समजेल, अशी सूचक प्रतिक्रिया सोनिया गांधी यांनी व्यक्त केली.  सोनिया यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात भाष्य केले. सोनिया यांच्या वक्तव्यामुळे राहुल यांच्याकडे लवकरच काँग्रेसचे प्रमुखपद सोपवले जाण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. यापूर्वी दिग्विजय सिंह यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी केली होती. मात्र, सोनिया गांधी यांनी याबद्दल नेहमीच मौन बाळगून होत्या.

यापूर्वी निवडणूक आयोगाने काँग्रेसमधील अंतर्गत निवडणुकांची (संघटनेतील निवडणूक) मुदत सहा महिन्यांनी वाढवली होती. त्यानुसार काँग्रेसला ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत पक्षांतर्गत निवडणूक घ्यावी लागेल. काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुकीत राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्त्वाची धुरा दिली जाऊ शकते. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी आहे. काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या माध्यमातून अंतर्गत निवडणुकांसाठी सहा महिन्यांचा अतिरिक्त कालावधी देण्याची मागणी करण्यात आली होती.