27 September 2020

News Flash

सोनिया गांधींच्या सुरक्षा ताफ्यातील एसपीजी कमांडो बेपत्ता

दिल्ली पोलीस या कमांडोचा शोध घेत आहेत

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (संग्रहित छायाचित्र)

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला विशेष सुरक्षा गटातील (एसपीजी) कमांडो सहा दिवसांपासून बेपत्ता आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या असून, दिल्ली पोलीस या कमांडोचा शोध घेत आहेत.

सोनिया गांधी यांना एसपीजीचे सुरक्षा कवच आहे. एसपीजीच्या ताफ्यात राकेश कुमार हा ३१ वर्षाचा कमांडो तैनात होता. राकेश कुमार हा द्वारका परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होता. १ सप्टेंबर रोजी राकेश कुमार ड्युटीवर जाण्यासाठी घरातून बाहेर पडला. घरातून निघताना तो गणवेशातच होता. १० जनपथ येथे सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी आल्यावर त्याने सहकाऱ्यांची भेट घेतली. काही वेळाने तो तिथून निघून गेला. जाताना तो रिव्हॉल्व्हर आणि मोबाईल फोन बंगल्यावरच ठेवून गेला. राकेश कुमारला अतिरिक्त वेळ थांबावे लागल्याने तो घरी आला नाही, असे सुरुवातीला त्याच्या कुटुंबियांना वाटत होते. मात्र दोन दिवस उलटूनही राकेशशी संपर्क होत नसल्याने त्यांनी १० जनपथ गाठले. राकेश कुमार बेपत्ता असल्याचे उघड झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी दिल्ली पोलिसांकडे धाव घेतली. मुलगा राकेश हरवल्याची तक्रार त्यांनी दाखल केली. राकेशला पत्नी आणि दोन मुले आहेत. सोनिया गांधींच्या सुरक्षा ताफ्यातील कमांडो बेपत्ता झाल्याची दखल सुरक्षा दलांनीही गांभीर्याने घेतली आहे. राकेश आपला मोबाईल १० जनपथवर ठेवून गेल्याने त्याचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. राकेश कुमारला १ सप्टेंबररोजी सुट्टी होती. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही तो घरातून ड्यूटीसाठी का निघाला असा प्रश्न तपास यंत्रणांना पडला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2017 3:53 pm

Web Title: congress president sonia gandhi security spg commando rakesh kumar missing delhi police investigation underway
Next Stories
1 गौरी लंकेश हत्या प्रकरणाची SIT चौकशी; मुख्यमंत्र्यांचे आदेश
2 नॉन्सेन्स!… राहुल गांधींच्या आरोपांना गडकरींचं उत्तर
3 गौरी लंकेश हत्या: सीबीआय चौकशीची कुटुंबियांची मागणी
Just Now!
X