जर आपण पंतप्रधान असतो तर विकास केंद्रीत धोरणांऐवजी रोजगार निर्मितीवर जास्त लक्ष दिलं असतं असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ऑनलाइन चर्चेदरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं. अमेरिकेतील हार्वर्ड स्कूलचे राजदूत निकोलस बर्न्स यांच्यासोबत राहुल गांधी यांनी ऑनलाइन चर्चा केली. यावेळी निकोलस यांनी राहुल गांधींना तुम्ही पंतप्रधानपदी निवडून आला असतात तर कोणत्या धोरणांना प्राथमिकता दिली असती असं विचारण्यात आलं.

“मी विकास केंद्रीय धोरणांऐवजी रोजगार केंद्रीय कल्पनेवर भर दिला असता. आपल्याला विकास हवा आहे असं मी सांगेन, पण निर्मिती आणि रोजगार उपलब्ध होण्यासाठी आम्ही सर्व काही करु,” असं उत्तर राहुल गांधी यांनी दिलं.

“सध्या जर तुम्ही विकास पाहिला तर विकास आणि रोजगार निर्मिती, मूल्यजोड, निर्मिती यांच्यात ज्या प्रकारचं नातं हवं तसं दिसत नाही. मी एकाही चिनी नेत्याला भेटलेलो नाही ज्याने आमच्याकडे रोजगाराची समस्या असल्याचं सांगितलं,” असं राहुल गांधींनी यावेळी सांगितलं. “जर रोजगाराचे आकडे दिसणार नसतील तर मला नऊ टक्क्यांच्या आर्थिक विकासात कोणताही रस नाही,” असंही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी यावेळी सरकारने सर्व संस्था ताब्यात घेतल्याचा आरोप करत २०१४ च्या आधी ज्यापद्दतीने संस्था कोणताही दुजाभाव न करता काम करत होत्या तशी परिस्थिती राहिलेली नसल्याचं म्हटलं.